लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील रेल्वेस्थानकातून धावणारी पनवेल-नांदेड, नांदेड-पनवेल रेल्वे बंद आहे. यामुळे परळीहून मुंबई-पुण्याला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही एक्स्प्रेस रेल्वे गाडी कधी सुरू होणार? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांतून विचारला जात आहे, तर कोरोनामुळे १२ पॅसेंजर बंद आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे.
नांदेड येथून पनवेलला जाणारी रेल्वे पुणे मार्गे आहे. यामुळे परळीहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची ही अडचण होत आहे. तसेच अमरावती-पुणे साप्ताहिक रेल्वेही बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. रेल्वे प्रवाशांना ट्रॅव्हल बसशिवाय पर्याय उरला नाही. मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद असलेल्या १२ पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या रेल्वे सुरू झाल्या तर प्रवायी संख्या जास्त होईल. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल. या कारणामुळे पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
....
बंद एक्स्प्रेस रेल्वे गाड्या
नांदेड-पनवेल
अमरावती-पुणे
कोल्हापूर-नागपूर
...
बंद पॅसेंजर गाड्या
आदिलाबाद-परळी
अकोला-परळी
पंढरपूर-निझामाबाद
मिरज-परळी
पूर्णा-परळी
हैदराबाद-पूर्णा
....
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
काकीनाडा -शिर्डी
सिकंदराबाद-शिर्डी
विजयवाडा -शिर्डी
औरंगाबाद-हैदराबाद
बंगळुरू-नांदेड
......
दोन दिवसांत सुरू होणाऱ्या रेल्वे
कोल्हापूर-नागपूर, नागपूर-कोल्हापूर रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
....
परळीहून पुणे, मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड ही रेल्वे गाडी सुरू करून प्रवाशांची गैरसोय टाळावी.
-महादेवअप्पा इटके, शहर उपाध्यक्ष, भाजपा, पुणे.
.....
मुंबईला जाण्यासाठी स्वस्त पर्याय असणाऱ्या रेल्वे बंद आहेत. यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने नाईलाजाने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. हा प्रवासाचा खर्चिक पर्याय आहे. नांदेड-पनवेल हुजूरसाहेब रेल्वे चालू करून प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिलासा द्यावा.
-अश्विन मोगरकर.
...
नांदेड-पनवेल, पनवेल-नांदेड रेल्वे ही एक्स्प्रेस व इतर पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयातून अद्याप आदेश आलेले नाहीत. जेव्हा आदेश येतील तेव्हा या गाडी सुरू करण्यात येईल.
-जितेंद्रकुमार मीना, रेल्वे मास्तर, परळी.
....