शिरुर कासार : सर्व जगाला त्रासून सोडलेल्या कोरोनाने देवादिकांना सुध्दा बंदिस्त करून ठेवले आहे. सतत भाविकांची वर्दळ असलेली श्रध्दास्थाने, मंदिराचे दरवाजे गत चार महिन्यां पासून बंद असल्याने नित्याने सकाळ - संध्याकाळ दर्शनाला जाणारे भाविक मंदिराच्या पायरीचेच दर्शन घेत असल्याचे चित्र दिसून येते. कधी उघडणार मंदिराचे दरवाजे ? याकडे सर्व भक्तांचे लक्ष लागले आहे.
शहरातील सिध्देश्वर व कालिका देवी म्हणजे शिव शक्तिचे पीठ समजले जाते. शहराबरोबरच इथे पंचक्रोशीतील लोक जसा वेळ मिळेल तसे दर्शनाला येत असतात. मात्र, ही मंदिर बंद असली तरी भाविकांचे पाऊल आपोआप वेळेला मंदिराकडे वळल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणावर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त झाल्याने शेकडो वर्षाच्या परंपरा मोडीत निघाल्या. नियमांच्या अधिन राहून औपचारिकता पूर्ण केली जात आहे. बाजार, जत्रा, यात्रा, नारळी, मोठमोठे सप्ताह याशिवाय लग्न समारंभ, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर बंधन लादली गेली. त्याचबरोबर मोठी तीर्थक्षेत्र, तिथे चालणाऱ्या उपक्रमात लाखो भाविकांना उपस्थिती वर्ज झाली. त्याचप्रमाणे हाच नियम गावोगावच्या मठ मंदिरांना देखील लागू असल्याने याचे दरवाजे पटापट बंद झाले. लवकरच ही महामारी आटोक्यात येईल आणि पूर्ववत सर्व सुरू होईल असे वाटत होते. मात्र, तसे न घडता कोरोना पाश घट्ट आवळला जात असल्याने मंदिराचे दरवाजे बंद झाले. शिवाय घंटानाद, टाळ मृदंग देखील मुके झाले.
हळूहळू व्यापार क्षेत्र सुरू झाले. नियमांच्या अधीन राहत लग्नाच्या अक्षदा पडू लागल्या, प्रवासही सुरू झाला. याशिवाय मदिराचे ग्लास रिकामे होऊन मद्यपींचा आत्मा शांत केला जात आहे. मात्र, मंदिराचे टाळे कायम ठेवल्याने भाविक खंत व्यक्त करीत आहेत. कधी उघडणार मंदिराचे दरवाजे? याकडे आशाळभूत नजरा लागलेल्या आहेत. हजारो भाविक दर्शनासाठी जाऊन कोरोनाला बळ मिळू शकते मात्र लहान मंदिरे नियम पालन करण्याचे बंधन टाकून सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याच्या भावना भक्तांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या जात आहेत.
महिलांचे पायरीवरच हळदी कुंकूमंदिर बंद असले तरी सध्या मात्र भाविक ठरलेल्या वेळेनुसार व सोयीनुसार भाविक मंदिराच्या पायरीचेच दर्शन घेत आहेत. महिला भाविक देखील पायरीलाच हळद कुंकू वाहत आपला भाव समर्पित करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचे हे संकट दूर व्हावे व पूर्ववत मठ, मंदिर, गडांना व प्रार्थना स्थळाला भाविकांचा बहर यावा असी प्रतिक्रिया सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केली. कोरोना पराभूत करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, आपण सुरक्षित राहून आपल्या भावना जतन कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.