- नितीन कांबळेकडा (बीड) : सुर्डी येथील गुप्तधन प्रकरणात पोलीसांकडून काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आम्हाला काहीच माहित नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती आहे. गुप्तधन संबंधितांनी हात वर केले असले तरी हे प्रकरण चव्हाटय़ावर आले असल्याने आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. येथील गुप्तधन बोलतं कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथे जानेवारीत नवीन घराचे काम करण्यासाठी विकत घेतलेल्या जुन्या वाड्याचे खोदकाम करत असताना यादवकालीन सुवर्ण नाणे सापडले. वाटाघाटीचे नियोजन केले.पण यातील एकाला समातंर वाटणी न झाल्याने त्याने या प्रकरणाचा बोभाटा केला. त्यानंतर पोलीस अधिक्षकांना फोटोसह घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर आष्टीचे पोलीस गावात गेले, पण इथे काहीच मिळाले नसल्याने परत आले. त्यानंतर आता महसुलचे कर्मचारी देखील गावात जाऊन पाहणी करून आले. पण त्यानाही हाती काहीच लागले नाही. गावातील कोणीच काही बोलत नसल्याचे पोलीस, महसुलकडून बोलले जात आहे. दरम्यान, पोलिस आणि महसूल विभागाच्या हाती काहीच लागले नसल्याने येथील गुप्तधन बोलतं होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाणे आले कुठून?पोलीस अधीक्षकांना फोटो पाठवल्यानंतर सुवर्ण नाण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर पोलिस आणि महसूल विभागाला गावातून काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाणे आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित राहतो. या संदर्भात काही जणांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी आता तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.