बीड : अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, तसेच इतर रुग्णांना लवकरात लवकर उपचार करता यावेत यासाठी आरोग्य विभागाने धारूर तालुक्यातील तेलगाव येथे करोडो रुपये खर्चून ट्रॉमा केअर युनिट उभारले; परंतु येथे सुविधा व इतर बाबी समोर ठेवून आरोग्य विभागाने या युुनिटचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासंदर्भात तीन वर्षांपूर्वी प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठविला. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
तेलगाव हे चार तालुक्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. राज्य महामार्ग जात असल्याने येथून नेहमीच छोट्या-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच या भागातील रस्ते खराब असल्याने अपघातात वाढ झाली होती. हाच धागा पकडून अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, त्यांच्यावर उपचार करता यावेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून फेब्रुवारी २००८ साली तेलगाव येथे ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यात आले. आकृतिबंधानुसार १२ पदेही मंजूर करण्यात आली; परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता इतर वेळी येथे अपुरे वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी यामुळे हे युनिट नावापुरतेच राहिले. त्यामुळे या युनिटची अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
नियमानुसार ट्रॉमा केअर युनिट हे उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयाशी संलग्न असते. गेवराई, परळी येथील ट्रॉमा केअरची त्याप्रमाणे निर्मिती झाली; परंतु तेलगावमध्ये मात्र तशी सुविधा नाही. त्यामुळेच आरोग्य उपसंचालकांनी या ट्रॉमा केअरचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांना सप्टेंबर २०१५ रोजी प्रस्ताव पाठविला. यावर अधिवेशनात चर्चाही झाली; परंतु अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही.
शासनाच्या उदासीन धोरणामुळेच ट्रॉमाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्यास अडचणी येत असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून केला जात आहे.याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.
३० खाटांची मागणी३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असावे, असा प्रस्ताव सादर केला आहे. बांधकाम, कर्मचारी, वेतन व भत्ते, रुग्णवाहिका, औषधी, साहित्य, प्रयोगशाळा साहित्य आदींबाबतचा समावेश करून त्याचा खर्चही प्रधान सचिवांना पाठविण्यात आला आहे.