- विनोद ढोबळे
विडा (जि. बीड) : धूलिवंदनाच्या दिवशी केज तालुक्यातील विडा येथे जावयाला गाढवावरून बसवून गावात मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या ८५ वर्षांपासून आहे; परंतु मागील काही वर्षांत गाढवांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे गाव जावयाची शिकार आणि त्याला मिरविण्यासाठी गाढवाचा शोध अशी कसरत विडेकरांना आतापासूनच करावी लागत आहे.
विड्याचे ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला होळीच्या दिवशी गावकऱ्यांनी थट्टामस्करी करीत गाढवावर बसवले आणि तेंव्हापासून दरवर्षी हाच पायंडा पडत गेला. विड्यातल्या या अनोख्या उत्सवाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जावयाच्या मिरवणुकीसाठी गाढव हे महत्त्वाचे साधन होते. पूर्वी दळणवळणासाठी गाढवांचा वापर होत असल्याने ते सहज उपलब्ध होते. गावात जीवन गायकवाड यांच्याकडे गाढव असायचे. वीसपेक्षा जास्त गाढवं त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्याकडील गाढव गावकरी उत्सवासाठी विनामूल्य वापरायचे. कालांतराने गाढवांची संख्या कमी होत गेली. गावात मागच्या वर्षी शेवटचे गाढव आजारपणाने मरण पावले. त्यावेळी हिवरापहाडी गावातून गाढव भाड्याने आणले होते. यंदा मंगळवारी धुळवड असल्याने एकीकडे जावयाचा शोध सुरु झाला आहे तर गाढव शोधण्याचे मोठे आव्हान विडेकरांसमोर आहे.
गावकरी सज्जगावात जावयाची गाढवावर मिरवणूक काढली जाते. सध्या जावयाची शोध मोहीम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर चांगले गाढवदेखील गावकरी शोधत असल्याचे उपसरपंच बी. आर. देशमुख म्हणाले. धुळवडीच्या या मोहिमेसाठी गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत,सूरज पटाईत,पप्पू सिरसाट, विकास वाघमारेसह ग्रामस्थ मात्र सज्ज झाले आहे.