लोकमत न्यूज नेटवर्क बीड : करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्यातील नाट्यमय घडामोडींचा दुसरा अंक सोमवारी पाहावयास मिळाला. त्यांच्यावर दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यानंतर गाडीत आढळलेल्या पिस्तुलावरून चालकालाही अटक करण्यात आली. याचवेळी एक व्यक्ती संशयास्पद वस्तू त्यांच्या गाडीतील डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हे पिस्तूल आधीच गाडीत होते की, ठेवले होते हे गूढ कायम आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांना अंबाजोगाई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखले तेव्हा करुणा यांनी जातिवाचक शिवीगाळ केली. त्यांच्यासोबतच्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी या महिलेवर चाकूहल्ला केला. याप्रकरणी विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात ॲट्राॅसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त केले असून, चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी) याला अटक केली आहे.
व्हायरल व्हिडिओची पडताळणी डिकीत संशयास्पद वस्तू ठेवताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची पडताळणी सुरू आहे.
स्वत:च मांडली बाजूसत्र न्यायालयात करुणा यांनी स्वत:च बाजू मांडत आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला. न्यायालयाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली, तर अरुण मोरेला पोलीस कोठडी सुनावली.
करुणा शर्मा यांच्या गाडीत बंदूक मिळणे, नंतर ती ठेवल्याचा व्हिडिओ समोर येणे हा सर्व प्रकार गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची दबावाविना सखोल चौकशी झाली पाहिजे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
करुणा शर्मा यांच्याबाबतीत रविवारी घडलेली घटना कटकारस्थान आहे. राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कुणावर अन्याय करण्याची भूमिका असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. - राम शिंदे, माजी मंत्री, भाजप