लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. उपाययोजना आणि नियोजनासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग दिवसरात्र धावपळ करीत आहे. बाधितांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी इतर आजारी रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांत तत्काळ सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड शहरात जिल्हा रुग्णालयासह दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत कोरोनाबाधित व संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्यांवर आदित्य महाविद्यालयात उपचार केले जातात. मागील वर्षभरापासून याच इमारतीत हे रुग्णालय कार्यान्वित आहे. आगोदरच हे रुग्णालय शहरापासून दूर आहे. त्यातही येथे गेल्यावर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. येथील शिपाई अथवा इतर कर्मचाऱ्यांना विचारल्यास डॉक्टरांची काेरोना वॉर्डमध्ये ड्यूटी असल्याचे सांगितले जाते. सर्वच कोरोना वाॅर्डमध्ये असल्याचे सांगितल्याने इतर अत्यवस्थ रुग्णांचे हाल होत आहेत.
रोज २० ते ३० रुग्णांना जावे लागते परत
जिल्हा रुग्णालयात रोज साधारण ४०० रुग्ण विविध आजारांवर तपासणी करण्यासाठी येतात. परंतु, अनेकदा येथे डॉक्टरच उपलब्ध नसतात. १२.३० वाजेपर्यंत वाट पाहून काही रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. याबाबत वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी यात सुधारणा केल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रुग्णांची गैरसोय
कोरोनामुळे सर्व प्रशासन त्यातच व्यस्त आहे. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयात तर कसलेच नियोजन नसल्याने सामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसते.
बाल, स्त्री रुग्णालयांचेही कोविड सेंटर
कोरोनाची रुग्णसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय रुग्णालयांत खाटांची संख्या अपुरी पडत असल्याचे पाहून, खासगी रुग्णालयांनी परवानगीसाठी गर्दी केली. यात बाल रुग्णालये, स्त्री रुग्णालये असलेल्या डॉक्टरांनीही कोविड सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी घेतली आहे.
बीड शहरात साधारण १० ते १५ अशी रुग्णालये असून, तेथील खाटाही पूर्ण भरल्याचे सांगण्यात येत आहे. याचा फटका इतर आजार असलेल्यांना बसत आहे. खासगी रुग्णालयांची संख्याही कमी झाल्याने आहे त्या रुग्णालयांत गर्दी वाढत आहे. असे असले तरी त्यांनी शुल्क वाढविले नसल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्णालय माझ्या अंतर्गत येत नाही; परंतु बीड शहरातील दोन्ही आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांत आजारी रुग्णांना सेवा देण्यात आम्ही कमी पडत नाहीत. काही चुका असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्या सुधारल्या जातील. गंभीर चुका करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड