बीड : जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा अक्षरश: सुळसुळाट सुुरु आहे. कधी वाहनाच्या डिकीत तर कधी नालीत पिस्तूलसारखे घातक शस्त्र आढळून येते. त्यामुळे शस्त्रांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ५० हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत पिस्तूल सहज उपलब्ध होते. त्यामुळे शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा परळी दौऱ्यावर होत्या. त्यांच्या वाहनाच्या डिकीत पिस्तूल आढळल्याचा आरोप करुन चालकाला अटक करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजले. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी शहरातील पेठ बीड भागात दोन गट भिडले. त्यानंतर जिथे हा वाद झाला, त्या घटनास्थळालगतच्या नालीत पेठ बीड पोलिसांना गावठी बनावटीचे बेवारस पिस्तूल आढळले. ते जप्त केले असून, ते नेमके कोणाचे आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. दि. २० सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे गावठी पिस्तूलासह दोघांना अटक करण्यात आली. या लागोपाठ घडलेल्या घटनांवरुन जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा कसा सुळसुळाट आहे, हे समोर आले.
.....
स्टेटस ऑफ सिम्बॉल !
तरुणांमध्ये पिस्तूलाचे मोठे आकर्षण आहे. ‘स्टेटस ऑफ सिम्बॉल’ म्हणूनही अनेकजण विनापरवाना पिस्तूल बाळगतात. अनेकजण पिस्तूलसह फोटो काढून चमकोगिरी करतात. वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचे फॅडही तरुणाईत आहे.
....
बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुध्द गुन्हे शाखेने वेळोवेळीे मोहिमा राबवून धरपकड केलेली आहे. नियमित कारवाया सुरु आहेत. शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे शोधून काढली जातील.
- सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड.
....
अवैध शस्त्रांवरील कारवायांचा लेखाजोखा
वर्ष एकूण कारवाया अग्निशस्त्रे तलवार व इतर
२०२० ३० ०६ २४
२०२१ ०६ ०५ ०१
......
यूपी, बिहार कनेक्शन
जिल्ह्यात आतापर्यंत पकडलेल्या बेकायदेशीर पिस्तूल प्रकरणाचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेश व बिहारमध्ये निघाले आहेत. इंदौर येथूनही बीडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे येतात, अशी खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
......