गेवराई (बीड ) : बांधबदिस्तच्या फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेताना गेवराईचे गटविकास अधिकारी विनायक भास्करराव येळंबकर यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी गेवराई पंचायत समिती कार्यालयात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदाराने येळंबकर यांच्याकडे बांधबदिस्तची फाईल दाखल केली होती. याच फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी येळंबकर यांनी चार हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने तक्रारीची खात्री केली. बुधवारी लाच स्विकारण्याचे ठिकाण निश्चीत झाले. तीन हजार रूपयांची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येळंबकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोशि कल्याण राठोड, भरत गारदे, मनोज गदळे, गणेश मेहत्रे आदींनी केली.