वडवणी : नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडालेल्या चिमुकल्याला वाचविताना बाप-लेकासह तिघे बुडाले. ही दुर्दैवी घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेने पोळा सणाच्या दिवशीच गावावर शोककळा पसरली.
अजय मधुकर खळगे (वय २५), भैय्या उजगरे (वय २२) व मधुकर खळगे (वय ५५) अशी मयतांची नावे आहेत. जिल्ह्यात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. वडवणी तालुक्यातही तब्बल १८८ मि. मी. पावसाची नोंद झाली. यामुळे नदी, नाले खळखळून वाहिले, तर तलावही तुडुंब भरले. मामला तलावही भरल्याने सांडवा वाहून पाणी पिंपरखेडजवळील नदीपात्रात गेले. याच पात्रात बंधारा असून येथे अजय काळे नावाचा मुलगा पाणी पाहताना बुडाला. त्याला वाचविण्यासाठी अजय व भैय्या दोन तरुणांनी पाण्यात उडी घेतली. एवढ्यात अजयला लाटेने बाहेर फेकल्याने तो बचावला. परंतु हे दोन्ही तरूण बुडत होते. एवढ्यात अजयचे वडील मधुकर खळगे यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याच्या प्रवाह आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ग्रामस्थांनी मधुकर यांना लगेच बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अजय व भैय्या यांचे मृतदेह तीन तासांनंतर देवडीमधील मासे पकडणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकले. आता तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, पोलीस प्रशासन तळ ठोकून होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली होती. तसेच या दुर्दैवी घटनेमुळे सर्जा - राजाच्या पोळा सणावरही विरजण पडले होते.
060921\06_2_bed_9_06092021_14.jpeg
नदीपात्रा शेजारी ग्रामस्थांनी अशी गर्दी केली होती.