स्पॉट रिपोर्ट - थेट कोरोना वॉर्डमधून
बीड : ‘ये कोण रे तू.. इथे का बसलास...आम्ही आहोत ना काळजी घ्यायला... चल हो बाहेर..’ असे म्हणत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी विनाकारण बसलेल्या नातेवाइकांना कोरोना वॉर्डातून बाहेर हाकलले, तसेच आमच्या परिचारिका आणि डॉक्टर पूर्ण काळजी घेत आहेत. घाबरू नका, सहकार्य करा, असे म्हणत नातेवाइकांना विश्वासही दिला. शुक्रवारी त्यांनी पूर्ण राउंड घेतला.
जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारापेक्षा नातेवाइकांचाच जास्त ताण असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षकांनी राउंड घेऊन नातेवाइकांना बाहेर काढले, तसेच मुख्य गेटवर पोलीस नियुक्त केले; परंतु हे पोलीस कर्तव्यात कसूर करीत असल्याने नातेवाइकांचा वॉर्डात वावर वाढतच आहे. त्यामुळेच शुक्रवारी सकाळीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते हे आपल्या पथकासह वॉर्डात गेले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. अशोक हुबेकर, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. विशाल कोटेचा, कॉलमन गणेश पवार, मुन्ना गायकवाड आदी हाेते. प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांना नातेवाईक दिसले. ते का आले आहेत, याची विचारणा केली. जे विनाकारण आहेत, त्यांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले, तसेच रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह स्वच्छता व उपचारात हलगर्जी करू नका, अशा सूचना आपल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिल्या.
एसपीच्या सूचना हवेत; सगळे पोलीस गायब
पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी गुरुवारी राउंड घेतला होता. यापूर्वीदेखील त्यांनी अनेकदा राउंड घेतला होता. प्रत्येक वेळी ते नातेवाइकांना विनाकारण आतमध्ये जाऊ देऊ नका, असे आदेश देतात; परंतु त्यांच्या आदेशाचे कोणीच पालन करीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या सूचना हवेतच विरत आहेत. एसपींच्या आदेशाचे पालन न करणारे अधिकारी, कर्मचारी प्रामाणिक कर्तव्य बजावीत असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता एसपींच्या राउंडलाही कमी महत्त्व प्राप्त होत आहे.
नातेवाइकांना आधार द्या, मदत करा
काही रुग्णांजवळ नातेवाईक थांबण्याची गरज आहेच. याची खात्री करून त्यांना आतमध्ये जाऊ देणे गरजेचे आहे, तसेच आतमध्ये जेवण वेळेवर मिळत नाही, तर काही लोकांना आवडत नाही. त्यांची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी नातेवाइकांनी आणलेले जेवणाचे डबे पोहोचविण्याची सोय करावी. यात सातत्य ठेवल्यास नातेवाइकांनाही सवय लागेल. या सर्वांना आधार दिल्यास आणि मदत केल्यास नातेवाईक फिरकणार नाहीत, असा विश्वास आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
मदतीसाठी १० वॉर्ड बाॅय २४ तास सेवेत
कोरोना वॉर्डामध्ये अथवा बाहेर कसलीही अडचण आली तर त्याचे तात्काळ निरसन व्हावे, यासाठी २४ तास १० वॉर्ड बॉयची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ड्रेसकोडही देण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये एक नियमित कक्ष सेवकाचीही नेमणूक करण्याच्या सूचना डॉ. गित्ते यांनी दिल्या आहेत.
===Photopath===
140521\14_2_bed_3_14052021_14.jpeg~140521\14_2_bed_2_14052021_14.jpg
===Caption===
मुख्य गेट सोडून पोलीस चौकीसमोर उभा असलेले पोलीस कर्मचारी. हे दुर उभा राहिल्यानेच नातेवाईक बिनधास्त आत-बाहेर करत आहेत.~कोरोना वॉर्डमधील माहिती घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, गणेश पवार आदी.