- सोमनाथ खताळ
बीड : परळीतील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे हा त्याच्याच रुग्णालयातील एका खोलीत झोपलेला होता. पथकाने त्याला उठवीत ओळख दिली. यावर सुदाम चांगलाच भडकला. ‘कोण रे तू? कशाला आलास? थोबाडीतच देईन’, असे म्हणत तो पथकावर भडकला.
परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात सुदामने बेकायदेशीरपणे रुग्णालय सुरू केले होते. त्याच्यावर छापा टाकण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीसांचे पथक शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास तेथे पोहचले. त्यावेळी सुदाम रुग्णालयातीलच एका खोलीत गाढ झोपलेला होता. पथकाने खोलीत जाऊन त्याला उठविले. यावर त्याने कोण रे तू?, असा प्रश्न विचारला. पथकाने ओळख देताच कशाला आलास?, असा उलट प्रश्न विचारला.
यावर पथकाने आपल्या तक्रारी आहेत असे सांगितले. लेखी तक्रार आहे का? थोबाडीतच देईन, असे म्हणत पथकातील अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केली. तसेच एका अधिकाऱ्याला बघुन घेतो, असे धमकीही दिली. रात्री ९ वाजता सुरू झालेली कारवाई पहाटे संपल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबद्दल प्रचंड गोपनियता पाळण्यात आली होती. मोजक्याच तीन अधिकाऱ्यांशिवाय कोणालाच याची माहिती न देता फौजफाटा रामनगरच्या दिशेने रवाना झाला होता. तत्पूर्वी कारवाईत सहभागी सर्वांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. या दरम्यान अनेक पोलिसांकडे शस्त्र होते.
‘माझ्या नादी लागू नको, महागात पडेल’१५ दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक अधिकारी रुग्णालयात खात्री करण्यासाठी गेले. यावर त्याने माझी तक्रार दाखव. तू आलासच कसा? असा दम दिला. मी जामिनावर आहे. मी प्रॅक्टिस करीत आहे, याचा पुरावा दाखव. गुपचूप निघायचे, नाहीतर मला ब्लॅकमेल करीत आहेस, म्हणून तुझ्यावरच केस करील, अशी धमकी त्याने दिली होती. तसेच माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर महागात पडेल, असा दमही या अधिकाऱ्याला सुदामने दिला होता.
‘रजिस्ट्रेशनची माहिती तुम्हीच घ्या!’पथकाने सुदामकडे रुग्णालयाची नोंदणी मागितली. यावर त्याने आपण रजिस्ट्रेशन मागितले होते. दिले की नाही, हे तुम्हीच तपासा. माझे फक्त मागणी करण्याचे काम आहे. जास्त बोलायचे नाही. नाहीतर थोबाडीत देईन, असे म्हणत धमकी दिली. पथकाची रात्रभर कारवाई सुरू असताना मुंडेचा हा गोंधळ सुरूच होता.
तीन दिवसांपासून कारवाईचे नियोजनपरळीतील गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर आल्यानंतरही परळीपासून जवळच असलेल्या रामनगर परिसरात दवाखाना सुरू केला. तेथे स्वत:च्या नावाचा बोर्डही लावला. रुग्णांवर उपचारही सुरू केले. याची माहिती आरोग्य विभागाला तीन महिन्यांपूर्वी मिळाली होती; पण तक्रार येत नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी याची खात्री केली आणि तीन दिवसांपूर्वी कारवाईचे नियोजन झाले. मोजक्या तीन अधिकाऱ्यांशिवाय कोणालाच याची माहिती न देता फौजफाटा रुग्णालयस्थळी धडकला.
गर्भपाताचे दुकान २०१०-२०१२ या काळात गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधींच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली ७० टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात होत असे.