बीड : बीडमधील मूल अदलाबदल प्रकरणातील ‘त्या’ बाळाचा आज फैसला होणार असल्याचे विश्वसनिय पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्या बाळाचे डिएनए रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडणार आहेत. या रिपार्टमध्ये नेमके काय येणार? यात दोषी कोण? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे पुढे येतील. तर संबंधित डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता मुलाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले.
येथील डॉक्टरांनी मात्र मुलाऐवजी मुलगी अशी नोंद केली. त्याच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुटी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ जिल्हा व खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले. परंतु काहीच समोर आले नाही. शेवटी पोलिसांनी बाळाचे रक्त नमुने घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले.
सात दिवस प्रक्रिया झाल्यानंतर याचा रिपार्ट बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बीड पोलिसांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. यामधून नेमके काय येणार? बाळ कोणाचे आहे? कोण दोषी असणार? बाळाची खरच अदलाबदल झाली का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.तर पोलिसांना तपासाचे आव्हानबाळाचे डीएनए थिटे यांच्यासोबत जुळले तर जिल्हा रूग्णालयातील कर्मचाºयांच्या चुकीमुळेच लिहिण्यात चूक झाल्याचे समोर येईल. यामुळे संबंधित दोन परिचारिका निलंबित होतील तर विभाग प्रमुख डॉक्टर व परिचारिका यांची आरोग्य विभागांतर्गत चौकशी होऊ शकते. परंतु जर रिपोर्टमध्ये तफावत आली तर हे बाळ नेमके जिल्हा रूग्णालयातून बदलले की खाजगी रूग्णालयातून, याचा तपास लावण्याचे शहर पोलिसांसमोर आव्हान राहणार आहे.
बाळाला भेटण्यासाठी आई आतुरछाया थिटे या मात्र सध्या मानसिक तणावाखाली आहेत. आपले बाळ कोणते? याबरोबरच आपल्या हातात आपला पोटचा गोळा कधी पडणार? यासाठी त्या आतुर झाल्या असल्याचे समजते. आपलेच बाळ देण्याची मागणीही त्यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही केली आहे.रिपोर्ट आल्यावरच तपासाला गतीमुल अदलाबदल प्रकरणात डीएनए रिपोर्ट आल्यावरच तपासाला गती मिळेल. बुधवारी दुपारी १२ पर्यंत १०० टक्के रिपोर्ट येतील. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.-सय्यद सुलेमानपोनि, शहर ठाणे, बीड