प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यामध्ये छावणी किंवा टँकर या दोन आवश्यक बाबींमध्ये काही जण भ्रष्टाचार करून माया गोळा करतात. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ याप्रमाणे जिल्ह्यात २०१८ साली ११० कोटी रुपये खर्च झाले होते. त्यानंतर दरवर्षी काही भागांत टँकर आवश्यक असते व त्याचा खर्च अवाच्या सव्वा असतो. याचा फायदा सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते घेत असल्याचे देखील समोर आलेले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र, यासाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने कोणतेही पाऊल शासनस्तरावरून उचलेले जात नाही. २०१८ साली जवळपास ९०२ टँकरचा वापर पाणीपुरवठा केला. त्यानंतर २०१९ साली ३८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यावेळी ८.५० कोटी खर्च करण्यात आला आहे. तर २०२० साली दुष्काळी परिस्थिती कमी होती, तरी देखील २२ टँकरसाठी ३.५० कोटी खर्च करण्यात आले आहेत. चालू वर्षात ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी जवळपास ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
राजकीय पक्षांची मिलीभगत
टँकरचे कंत्राट एका कंपनीने घेतले असले, तरी देखील त्या-त्या तालुक्यात स्थानिक नेतृत्व व सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे टँकर कामासाठी घेतले जातात. नागरिकांच्या गरजेनुसार पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनादेखील समोर आलेल्या आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आलेली होती.
टँकरचे पाणी मुरते कुठे?
जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या कालावधीत चांगला पाऊस झाला आहे. तरीदेखील टँकरची आवश्यकता भासली आहे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शासनस्तरावरून दुष्काळ पडणार नाही, यासाठी शाश्वत विकासाच्या दृष्टीने उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
-समाधान जगताप, सर्वसामान्य नागरिक
जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात जलस्तर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी महत्त्वाची भूमिका या योजनेने बजावली असून, या सरकारने देखील अशी योजना पुन्हा सुरू करावी.
-अशोक सुखवसे, सामाजिक कार्यकर्ते
वर्ष टँकर संख्या खर्च
२०१८ ९०२ ११० कोटी
२०१९ ३८५ ८.५० कोटी
२०२० २२ ३.५० कोटी
२०२ १ ४ ५७ लाख