बीड : शहरात सध्या सर्वत्र अवैध होर्डिंग आणि बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले आहेत. तसेच रस्तेही अरुंद बनले आहेत. या विद्रूपीकरणाला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. हे सर्व दिसत असतानाही पालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शहरात पालिकेचा कसलाही वचक राहिलेला. चुकीचे घडत असल्याचे दिसूनही कारवायांना आखडता हात घेतला जात आहे.
शहरात बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी जवळपास २४ ठिकाणे ठरवून दिलेली आहेत. याचे कंत्राट एका खाजगी व्यक्तीला दिलेले आहे; परंतु त्या व्यक्तीकडे कोणीच जात नाही. जो तो नेता, पुढारी, लाेकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते चौकाचौकांत, मुख्य रस्त्यांवर, गल्ली बोळात अनधिकृत बॅनर लावतात. त्यामुळे शहर विद्रूप होत आहे. याबाबत वारंवार काही लोकांनी पालिकेकडे तक्रारीही केल्या; परंतु बॅनर लावणारे हेच पालिकेतील काही सत्ताधारी आणि विरोधक असतात. एकावर कारवाई करायला गेल्यास दुसऱ्याकडे बोट दाखविले जाते. या दोघांच्या वादात कोठे पडायचे, असे कारण पुढे करत पालिकाही कारवाया करण्यास आखडता हात घेत असल्याचे दिसते. याचा फटका शहराला आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे. सुंदर व स्वच्छ शहर या अनधिकृत बॅनरबाजीमुळे विद्रूप झाले असून हे सर्व बॅनर हटविण्याची मागणी होत आहे.
या ठिकाणी सर्वात जास्त बॅनर
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांत सर्वांत जास्त अनधिकृत बॅनर लावले जातात. नेत्याचा वाढदिवस, कार्यक्रम अथवा इतर काही असले की पेट्राेलपंपाच्या बाजूला उंचची उंच बॅनर लावले जाते. याकडे पाहताना अनेकदा अपघातही होतात. तसेच नगर रोड, जालना रोड, सुभाष रोड, बार्शी रोड या मुख्य रस्त्यांव सर्वात जास्त बॅनरबाजी केली जात असल्याचे दिसते.
अनेक वर्षांपासून कारवाईच नाही
अनधिकृत बॅनर लावल्याने अधिकृत बॅनर लावण्यास कोणीच पुढे येत नाही. हे बॅनर हटविण्याबात संबंधित कंत्राटदाराने मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून बॅनरवर एकही कारवाई झालेली नाही. काही वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी एक कारवाई झाली होती.
सीओ, उपलब्ध होईनात...
या प्रकाराबाबत बीड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना दोन वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिलाच नाही. ते वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी बीडकर करत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.