बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २०१५ सालापासून जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्याला भीषण दुष्काळाचा सामना का करावा लागत आहे. या दुष्काळाला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जास्त पाणी लागणारी पिके घेऊन भरमसाठ पाणी उपसा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते ऊस हे पीक जिल्ह्याच्या भौगोलिकदृष्ट्या लागवडीसाठी योग्य नाही. मात्र, जास्त पैशाच्या हव्यासापायी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते व जमिनीवरील साठ्यातील पाणी संपल्यानंतर जमिनीच्या आतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावत असून, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती दर एका वर्षाआड निर्माण होत आहे. मात्र, हा निसर्गनिर्मित दुष्काळ नसून मानवनिर्मित असल्याचे जलतज्ज्ञांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. जलयुक्त शिवार योजना २०१५ पासून आजपर्यंत राबवली जात आहे. मात्र तरी देखील ज्या प्रमाणात कामे झाली असे सांगितले जाते त्या पटीने भूजलपातळी किंवा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे जिल्ह्यात कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे ‘जलयुक्त शिवार योजना दुष्काळ निवारणासाठी होती का कंत्राटदारांना पोसण्यासाठी; असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.जलयुक्त शिवार योजनेची आकडेवाडी फसवी ?राज्य शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. जिल्ह्यात १४०० गावे व वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी २०१५ ते २०१ब्९ या कालावधीत जवळपास १०१० गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी यावर्षीची कामे सुरु आहेत. तसेच रोहयो व इतर विभागाच्या माध्यमातून योजना राबवण्यात आल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली असतील तर पाणी मुरतय कुठं असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच २०१५ पासून झालेल्या विभागनिहाय कामांची तपासणी व चौकशीची मागणी होत आहे.उसाला फळबाग पर्यायबीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील धरणांमधील निम्म्यापेक्षा अधिक पाणी उपसा हा ऊस या पिकासाठी केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्याय होत असून, तो टाळण्यासाठी ऊस पिकाला पर्याय फळबाग असल्याचे मत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून अधिकचे उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबागा लावणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी फळबाग लागवड करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाला जबाबदार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:36 AM
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय भयावह आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जिल्ह्यात जवळपास ७०० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
ठळक मुद्देजलयुक्त शिवारचे पाणी मुरतंय कुठे ? : भरमसाट उपसा केल्यामुळे भूजल पातळी खालावली