लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली. असे असले तरी अद्यापही अपेक्षेप्रमाणे व्यापारी पुढे आलेले नाहीत. परंतु, जे आले ते देखील कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे केंद्रावर दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाही. मास्कही वापरत नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यापाऱ्यांचे समुपदेशन करण्यातही प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज १५० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. रविवारी तर विक्रमी २६० रुग्ण आढळले. वाढती रुग्णसंख्या पाहता चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. तसेच व्यापाऱ्यांची कोरोना चाचण्याही केल्या जात आहेत. रविवारपर्यंत सर्वांनी चाचण्या करणे बंधनकारक हाेते. परंतु, या मोहिमेला सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ चार हजारपर्यंत व्यापाऱ्यांनी चाचण्या करून घेतल्या. अद्यापही सहा हजारांपेक्षा जास्त व्यापारी चाचणी करणे बाकी आहेत.
दरम्यान, जे चाचणी करणार नाहीत, त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत. जे उघडतील त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेला आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवायचे
कसे ?
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची कामे विभागून दिलेली आहेत. परंतु, जो तो आपली कामे व्यवस्थित पार पडत नसल्याने गर्दी होण्याची भीती आहे.
मी एका दुकानावर कामगार आहे. कोरोना चाचणीला आलो होतो. परंतु, येथे कसलेच नियोजन नाही. कोणीही कधीही येते आणि मध्येच चाचणी करून जाते. रांगेत उभा असलेले लोकही सामाजिक अंतर ठेवत नाहीत. येथे आल्यावरच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. फक्त नियोजन योग्य असावे.
गणेश शिंदे
कामगार, बीड
कोरोना चाचणी केली आहे. सकाळपासून रांगेत उभा होतो. प्रशासन सूचना देत होते, परंतु लोक ते पाळत नव्हते. तर, काही ठिकाणी प्रशासनही कमी पडत होते. गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करून कडक पावले उचलावे. चाचणी आणि अहवालासाठीही मला प्रतीक्षा करावी लागली.
अमितेश कुलकर्णी
दुकानदार, बीड शहर
बीड शहरातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी चार केंद्रे तयार केली आहेत. प्रत्येक केंद्रावर पोलीस, शिक्षक, कर्मचारी, डॉक्टर नियुक्त केलेले आहेत. प्रशासन म्हणून सूचना केल्या जात आहेत. परंतु, तरीही कोठे काही गर्दी वाटत असेल, तर तत्काळ सुधारणा केली जाईल.
- डॉ. नरेश कासट, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
===Photopath===
140321\142_bed_10_14032021_14.jpg~140321\142_bed_9_14032021_14.jpg
===Caption===
कोरोना चाचणी करताना व्यापारी, कामगार दिसत आहेत.~बीड शहरातील कोरोना चाचणी केंद्राबाहेरील गर्दी