अंबाजोगाई : येत्या १५ जानेवारी रोजी अंबाजोगाई तालुक्यातील चार ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. परंतु, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यावर निघणार असल्याने पॅनलच्या खर्चाची जबाबदारी कोणी घ्यायची, हा खर्च कोण करणार, असा प्रश्न आता पुढारी व सरपंचपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना पडला आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवू लागल्याने नेमका खर्च करायचा कोणी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात एकूण ७ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. यातील तीन ग्रामपंचायती मूर्ती, केंद्रेवाडी आणि हनुमंतवाडी या बिनविरोध निघाल्या. आता धावडी, अंबलवाडी, वाकडी, दत्तपूर या चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. काहींनी निघालेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी योजना आखणे सुरू केले होते. मात्र, शासनाने अचानकच आरक्षण रद्द करण्याचे आदेश काढले.
आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी अनेकांचा हिरमोड झालेला आहे. मतदानानंतरच तरतुदीनुसार सरपंच आरक्षण निघणार आहे. त्यामुळे सरपंच कोण होणार हे अद्याप निश्चित नाही. पॅनल दोन्ही बाजूंनी झाले. मात्र, नेमके सरपंच पद कोणाला, या बाबत अजूनही संभ्रम आहे. खर्च आपण करायचा अन् आरक्षण दुस-याच्या नावे पडायचे, अशी स्थिती होऊ नये म्हणून प्रत्येक जण सावध भूमिका घेऊ लागला आहे. आता केलेला खर्च पुढे काढायचा कसा, ही समस्याही पॅनलप्रमुखांना भेडसावणारी ठरू लागली आहे. त्यामुळे सध्या सर्वच उमेदवार एकत्रित मिळून खर्च करायचा की नाही, या तयारीला लागले आहेत.