बीड : कर्तव्यावर जाणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात अद्याप संबंधित डॉक्टरने कोठेच लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता डॉक्टरवरच संशय व्यक्त होत असून पोलिसांशी हुज्जत घातल्यानेच मारहाण केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांविरोधात आवाज, रान पेटविणाऱ्या सर्वच संघटना आता गप्प झाल्या आहेत. हा सर्व संताप केवळ सोशल मीडियापुरताच राहिल्याचे दिसले.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे यांची गुरुवारी कोविड सेंटरला ड्युटी होती. त्यासाठी ते बुधवारी रात्रीच दुचाकीवरून आष्टीकडे जात होते. याचवेळी त्यांना चऱ्हाटा फाटा येथे पोलिसांनी अडविले. यावेळी त्यांना मारहाण झाली होती. आपण ओळखपत्र दाखवूनही मारहाण केल्याचा आरोप डॉ. वनवे यांनी केला होता. त्यानंतर सर्व डॉक्टर व त्यांच्या संघटनांनी कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला होता. रात्रभर जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला वेठीस धरले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडते की काय? असा प्रश्न होता; परंतु चौकशी समिती नियुक्त केल्याने हे सर्व शांत झाले.
दरम्यान, दोन दिवस उलटूनही जखमी डॉक्टरने मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दिलेली नाही. एवढी मारहाण झाली तर डॉक्टर शांत का बसले? यांच्याकडेच काही चूक होती का? यांनीच पोलिसांशी हुज्जत घातल्याने त्यांनी मारहाण केली का? त्यांच्यावर पोलीस किंवा राजकीय लोकांचा दबाव आहे का? पुढे काही त्रास नको म्हणून ते माघार घेत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत डॉ. वनवे यांच्याशी गुरुवारी पाचवेळा आणि शुक्रवारी तीन वेळा संपर्क केला; परंतु त्यांनी भ्रमणध्वणीला प्रतिसाद दिलाच नाही.
सोशल मीडियावरील चर्चा शांत
ज्या दिवशी डॉ. वनवे यांना मारहाण झाली, त्याच दिवशी सरकारी डॉक्टरांच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यात काहींनी संघटना व पदाधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. काहींनी अंतर्गत निर्णय न पटल्याने बैठकीतून बाहेरही पडले. आंदोलनासह आणखी बरेच इशारे देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिली आहे. डॉक्टरने तक्रार न दिल्याने त्यांच्या त्या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचे बोलले जात आहे.
मीडियाही डाॅक्टरांच्या सोबतडॉक्टरला ज्या प्रकारे अमानुष मारहाण झाली, त्या प्रकरणात बीडमधील मीडियादेखील डॉक्टरांच्या बाजूने होती. मीडियानेदेखील पोलिसांविरोधात रोष करत मारहाण करणे चूक असल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणात तक्रार दाखल होण्याची अपेक्षा सर्वांनाच होती; परंतु डॉक्टरने तक्रार न दिल्याने केवळ चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.