प्रभात बुडूख
बीड : महागाई वाढल्यामुळे दैनंदिन गरजा भागवणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. जिल्ह्यातील कोतवाल तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. त्यांना चप्पलसाठी फक्त १० रुपये भत्ता मिळत असून, अशी चप्पल कोणत्या ठिकाणी मिळते? असा प्रश्न कोतवालांकडून विचारला जात आहे.
जिल्ह्यात ३७१ कोतवालांची पदे आहेत. त्यापैकी १३० जागा रिक्त असून, २४१ कोतवाल कार्यरत आहे. यापैकी बहुतांश कोतवाल हे तहसील कार्यालयात कामावर असल्याचे वास्तव असून, कोतवालाच्या तुटपुंजा मानधनावर पडेल ते काम त्यांच्याकडून करून घेतले जात आहे. त्यामुळे गाव पातळीवरील कामांवर देखील याचा परिणाम होत आहे. किमान वेतन अदा करण्याची मागणी कोतवाल संघटनेकडून केली जात आहे. पाच वर्षाच्या आतील कोतवालांना ७५०० तर १० वी पास व पाच वर्ष पूर्ण झालेल्यांना १५ हजार रुपये मानधन दिले जाते. दरम्यान, सरळ सेवेतून कोतवाल भरती झाली आहे. त्यामुळे पदोन्नती होईपर्यंत हे मानधन दिले जाते. पदोन्नतीची प्रक्रिया २०१५ पासून रखडली आहे. त्याकडे शासनाचे कायम दुर्लक्ष होत असून, जिल्हा प्रशासनाने कोतवालांना त्यांच्या त्यांच्या सज्जावर कामासाठी पाठवावे, अशी मागणी देखील केली जात आहे.
...
तहसीलचा कारभार कोतवालांवर अवलंबून
जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात निवडणुकीच्या वेळी कोतवालांना तहसील कार्यालयात विविध कामे दिली होती. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर देखील शिपाई ते कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर कामांसाठी कोतवालांचा वापर केला जात आहे. त्यामुळे बहुतांश कारभार हा कोतवालांवर अवलंबून असून किमान शिपाई संवर्गातील वेतन या कामासाठी देण्याची मागणी केली जात आहे.
...
कामाची यादी भरली मोठी
पीक पाहणी करून अहवाल सादर करणे
तलाठ्यासोबत फिरून शेतसारा गोळा करणे
शासनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे
मयताच्या वारसाची खरी माहिती प्रशासनाला देणे
तहसीलदार कार्यालयात विविध कामे करावी लागतात.
...
अपुऱ्या मानधनात कसे भागणार?
महागाई वाढल्यामुळे कोतवालांच्या मानधनात वाढ करणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी मागणी कोतवाल राज्य संघटनेकडून करण्यात आलेली आहे.
-मंजूर शेख, कोतवाल
...
सरळ सेवेतून कोतवाल झालेल्यांना शासनाने नियमांनुसार पदोन्नती करावी. जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील कामाऐवजी सज्जावर कामासाठी पाठवावे. टपाल भत्ता देखील मागील अनेक महिन्यांपासून देण्यात आलेला नाही. तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी होणारा खर्च देण्यात येत नाही. जिल्हा प्रशासनाने मागण्यांवर विचार करणे अपेक्षित आहे.
-अरविंद राऊत, कोतवाल संघटना, जिल्हाध्यक्ष.
...
मंजूर ३७१
रिक्त १३०
...
कोणत्या तालुक्यात किती
तालुका मंजूर पदे रिक्त पदे
बीड ६१ २८
गेवराई ५७ १७
शिरूर कासार २१ ०८
आष्टी ४५ १९
पाटोदा २२ १०
माजलगाव ३७ ०९
धारूर १६ ०८
वडवणी १४ ०१
केज ४० ०६
अंबाजोगाई २९ ११
परळी २९ १३