बीड : आज्जी काय चाललंय... बरं वाटतंय का? काही त्रास नाही ना... बोटाला चिमटा लावतेत का? डॉक्टर, कर्मचारी तपासतेत का? जेवण जातंय ना... पोटभर जेवा आणि ताण घेऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरू नका, असे म्हणत अधिकारी कोरोनाबाधित रुग्णांना आधार देत आहेत. पाटाेदा शहरातील कोविड सेंटरला अचानक भेट देऊन तपासणी कारण्यात आली. यावेळी हे चित्र पाहावयास मिळाले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत, तसेच मृत्यूदरही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आणि गंभीर परिस्थिती पाहून वृद्ध रुग्ण जास्त घाबरत आहेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मानसिक आधाराची गरज भासत आहे. कुटुंबापासून दूर राहून कोविड सेंटरमध्ये उपचार होत असल्याने त्यांच्या मनात भीती वाढत आहे. हाच धागा पकडून सध्या आरोग्य पथकांकडून अशा रुग्णांना औषधोपचार करण्यासह आधार देण्याचे काम केले जात आहे. शुक्रवारीही पाटोद्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे यांनी पाटोद्यातील कोविड सेंटरला अचानक भेट दिली. कोविड वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. वृद्ध रुग्णांशी गप्पा मारून त्यांना काळजी घेण्यासह आधार देण्याचे काम केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाला बांगर हेदेखील उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या या आधारामुळे वृद्धांना दिलासा मिळत आहे.
आजारी असतानाही रुग्णांची सेवा
पाटोद्यातील कोविड सेंटरमध्ये डॉ. प्रगती बिनवडे या वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. गुरुवारी त्यांना अशक्तपणा आणि ताप होता. त्यांनी अँटिजन तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली. शुक्रवारी त्यांनी इंजेक्शन आणि औषधोपचार घेऊन लगेच कर्तव्यास सुरुवात केली. आजारी असतानाही कर्तव्य बजावण्याऱ्या डॉ. बिनवडे यांचे स्वागत होत आहे. एकीकडे डॉ. बिनवडे याचे कर्तव्य, तर दुसऱ्या बाजूला काही डॉक्टर धडधाकट असतानाही कामचुकारपणा करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बाळा बांगरकडून बाधितांना मदत
पाटोदा येथील बाळा बांगर हे मागील वर्षभरापासून कोराेनाबाधित रुग्णांची मोफत सेवा करत आहेत. बाधितांना रुग्णालयात नेणे, बीडला तपासणीसाठी घेऊन जाणे, आणणे, रुग्णालयात अथवा सीसीसीमध्ये काही अडचण असल्यास त्यांना मदत करण्याचे काम बाळा हे करीत आहेत. विशेष म्हणजे सीसीसीमध्ये उपस्थित राहून प्रत्येक रुग्णाच्या जेवणाची आणि औषधांची नातेवाईक बनून ते काळजी घेत असल्याचे दिसले.
कोट
सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सीसीसीमध्ये ठेवले जाते. येथे त्यांची सर्व काळजी घेतली जात आहे. औषधोपचार तर सुरूच आहेत; पण त्यांना मानसिक आधार देण्याचीही खूप गरज आहे. इतर रुग्णांचे ठीक आहे; पण वृद्धांना आधाराची खूप गरज आहे. म्हणूनच आम्ही गेल्यावर रुग्णांना आधार देतोत, तसेच आमचे पथकही त्यांना उपचार करून धीर देते.
डॉ. एल.आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा
===Photopath===
300421\30_2_bed_18_30042021_14.jpeg
===Caption===
पाटोदा सीसीसीमधील वृद्ध रूग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस करताना डॉ.एल.आर.तांदळे.