अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आभाळाला भिडल्या असताना डिलिव्हरीसाठी देखील पुन्हा जादा पैसे मोजावे लागत आहेत. डिलिव्हरी बॉयने जादा पैसे घेणे बेकायदेशीर असतानाही ते पैशांसाठी अडून बसतात. महागाईने हैराण असणाऱ्या ग्राहकांसाठी हा जादा भार डोकेदुखी ठरत आहे.
गॅस कंपन्यांच्या पावतीमध्ये सिलिंडर घरापर्यंत पोहोच करण्यासाठीचे पैसे नोंदविलेले असतात. सध्या ८८५ रुपयांना सिलिंडर मिळतो. त्यामध्ये सुमारे २७ रुपये हे घरपोहोच डिलिव्हरीसाठीचे असतात. तरीही ग्राहकाला जादा १५ ते २० रुपयांसह एकूण ९०० रुपये मोजावे लागतात. वरचे १५ रुपये म्हणजे डिलिव्हरी बॉयची टीप, खुशाली किंवा सिलिंडर दिल्याबद्दल चहा पाण्याचा मेहनताना ठरतो. पुढच्या खेपेला सिलिंडर वेळेत येणार नाही या भीतीने ग्राहकदेखील मुकाटपणे १५-२० रुपयांची टीप देतात. ग्राहकाने थेट एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास त्याचे २७ रुपये वाचतील; पण गॅस कंपन्या आणि एजन्सी ही बाब ग्राहकांना सांगत नाहीत. अगोदर महागाईचा झटका सोसत असणाऱ्या ग्राहकांना आता अशा पद्धतीने जादा दराचाही फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
१४.२ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर वर्षभरात ३०० रुपयांनी महागला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तो ५८० रुपयांना मिळत होता. सध्या त्यासाठी ८८५ रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांसाठी ही दरवाढ आवाक्याबाहेरची ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांत तर प्रत्येक महिन्याला दरवाढ सुरू आहे.
...
सिलिंडरसाठी जातात ९०० रुपये
सिलिंडरची ८८५ रुपयांची पावती डिलिव्हरी बॉय देतो. पैसे मात्र १५-२० रुपये जादाच घेतो. सिलिंडर ९०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने पाच रुपयांचाही विचार करावा लागत आहे.
-राणी गायकवाड, गृहिणी.
..
सिलिंडर महाग झाला तरी डिलिव्हरी बॉयची टीप मात्र थांबलेली नाही. पावतीनुसार पूर्ण पैसे दिल्यानंतरही २० रुपये जादा घेतातच. ९०० रुपये दिल्यानंतर वरचे १५ रुपये परत मिळत नाहीत.
-अंजली कुलकर्णी, गृहिणी.
...
वितरक काय म्हणतात...
जादा पैसे देण्याची आवश्यकता नाही
सिलिंडर डिलिव्हरीसाठी कामगारांना जादा पैसे देण्याची आवश्यकता नाही. जितके बिल, तितकेच पैसे द्यावेत. कामगाराने जादा पैशांसाठी सक्ती केली तर ग्राहक तक्रार करू शकतात. जादा दिले जाणारे पैसे म्हणजे ग्राहक आणि डिलिव्हरी बॉय यांच्यातील वैयक्तिक विषय ठरतो. काही ग्राहक अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या चौथ्या मजल्यावर राहतात. इतक्या उंचीवर सिलिंडर आणल्याबद्दल काही ग्राहक स्वतःहून १०-२० रुपये जादा देतात.
-अमित जगतकर, गॅस एजन्सीधारक, अंबाजोगाई.
..
गॅस एजन्सीधारकांना किती रुपये घ्यायचे याचा नियम आहे. गॅसच्या किमतीतच घरपोच डिलिव्हरीचे पैसे आले. अतिरिक्त पैशांची आमच्याकडे तक्रार करा.
-अमित जगतकर.
..
सध्याचे गॅस सिलिंडरचे दर-८८५
शहरातील एकूण ग्राहक-२८४००
------------