दहावी निकालानंतर विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी वाढली धावपळ
अंबाजोगाई : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असून, विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.
दहावीनंतर विद्यार्थी शक्यतो वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असते. त्यामुळे इयत्ता अकरावीचे वर्ष हे रेस्ट इयर समजून, तसेच बारावीचे वर्षही सोपे जावे म्हणून विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांची निवड करतात. विशेषत: ग्रामीण भागातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सवलती दिल्या जातात. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तासिका करण्याची गरज नसते. तसेच चाचणी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांचे मार्क महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे देतात, अशी धारणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. काही महाविद्यालये अशा प्रकारची सवलतही देतात. बारावीनंतर घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. तसेच ग्रामीण भागात परीक्षेच्या कालावधीत कोणतेही बंधने नसतात. या ठिकाणी प्रात्यक्षिक व चाचणी परीक्षेचेही स्वरूपही विद्यार्थ्यांच्या मनावर असते. त्यामुळे गावात प्रवेश घेतले जातात.
म्हणून घेतला गावांत प्रवेश
शहरातील महाविद्यालयात रोज तास करण्याची अट घालण्यात येते. विशेषत: नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर रोज तास करणे अनिवार्य असते. त्यामुळे मग खासगी शिकवणी करण्यास वेळ मिळत नाही. तसेच बारावीलाही महाविद्यालये प्रात्यक्षिकात मनासारखे मार्क देत नाहीत.
- माउली जगताप, विद्यार्थी
शहरात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. त्यासाठी चांगले मार्क घ्यावे लागतात. मग अशा वेळी शहराजवळ असलेल्या पण ग्रामीण भागात येणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे वाटते. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही. तसेच तास करण्याची गरज नाही.
- मुक्ता भिसे, विद्यार्थिनी
ऑफलाईन प्रवेश होणे गरजेचे.
दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी मुले विशेषतः ग्रामीण भागाची निवड करतात; कारण शहरातील महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया अवघड समजली जाते. या ठिकाणी गुणवत्तेनुसार यादी प्रसिद्ध होऊन मगच प्रवेश दिला जातो.
- गोविंदराव देशमुख, संस्थाचालक
ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. तासिका व प्रात्यक्षिक न करता विद्यार्थी इतरत्र खासगी क्लाससाठी जातात. म्हणून शहरातील शिस्तप्रिय महाविद्यालय त्यांना नको वाटते.
- संकेत मोदी, संस्थाचालक
अंबाजोगाई तालुक्यात प्रवेश देणारी महाविद्यालये- १२
गेल्या वर्षी किती अर्ज आले होते- ३२००
एकूण जागा- २८००
शिल्लक जागा- ४२