लसीकरण संथ गतीने
वडवणी : शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती मिळत नसल्याची स्थिती आहे. लस उपलब्ध असतानाही ऑनलाईनच्या गोंधळामुळे नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे दररोजचे उद्दिष्टदेखील पूर्ण होत नाही. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
वाहनधारक त्रस्त, तर प्रवाशांच्या खिशाला झळ
वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करण्यासाठी बसची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. पेट्रोल दरवाढीचा चढता आलेख कायम राहत असल्याने, इंधन दरवाढीने वाहनधारक त्रस्त झाल्याने यांचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. सध्या पेट्रोलने शंभरी पार केल्याने वाहनधारकांबरोबर प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा विसर
वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत यामुळे कोविडचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करून नये म्हणून स्थानिक प्रशासनाने निर्बंध लादण्याची व अंमलबजावणी करण्याची गरज आहे.