बीड : पुणे महानगरपालिकेच्या बसमध्ये वाहक असलेल्या तरुणाने गावी येऊन आत्महत्या केली होती. ही घटना परळी तालुक्यातील अस्वलअंबा येथे ५ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, मयताच्या खिशात सुसाईट नोट आढळली असून त्यात पत्नी व तिच्या प्रियकराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. त्यानुसार, पत्नी व प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात नोंद झाला.
माधव प्रभाकर ढाकणे (३३, रा. अस्वलअंबा, ता. परळी, ह.मु.टकले नगर, शेवाळवाडी, पुणे) असे मयताचेे नाव आहे. ते पुणे महापालिकेच्या बसवर वाहक म्हणून नोकरी करत. पुण्यात ते पत्नी व मुलासोबत राहत. ३ रोजी ते दुचाकीवरून गावी अस्वलअंबा येथे आले. कुटुंबीयांनी एकटा का आला, असे विचारले असता पत्नी शोभा ही जाकीर मुजावर (रा. गोंधळीनगर, हडपसर, पुणे) याच्यासोबत पळून गेल्याचे सांगितले. दरम्यान, माधव यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तिचा शोध लावला, पण तिने स्वखुशीने जाकीर मुजावरसोबत आल्याचा खुलासा केला. माधव याने मुलाचा ताबा देण्याची विनंती केली तेव्हा तिने व जाकीर मुजावर याने नकार देत पुणे सोडून जा अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. ५ एप्रिल रोजी माधव यांनी गट क्र. ३८१ मधील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा पँटच्या खिशात सुसाईट नोट आढळली. त्यात पत्नी शोभा व जाकीर मुजावर यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद होते. मुलाला आपण त्यांच्याकडून घेऊन यावे, अशी विनंतीही त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे. मयत माधव यांचे बंधू बालाजी प्रभाकर ढाकणे यांच्या तक्रारीवरून शोभा ढाकणे व जाकीर मुजावर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.