अंबाजोगाई (जि. बीड) : येथून जवळच असलेल्या सातेफळ शिवारातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर जोडप्यांमध्ये मंगळवारी रात्री केवळ ३०० रुपयांच्या खर्चाचा हिशोब देण्यावरून वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या पतीने पाच महिन्यांच्या चिमुरड्या लेकीसमोरच पत्नीला विटांनी ठेचून ठार मारले. बुधवारी (दि. ३१) पहाटे खुनाची ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर परराज्यात पलायनाच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या चार तासात उस्मानाबाद जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
दीपाली आश्रुबा नरसिंगे (२२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपालीची आई भारती भागवत उपाडे (रा. गिरवली, ता. अंबाजोगाई) यांनी तक्रार दाखल केली आहे. दीपालीचा विवाह मागील वर्षी आश्रुबा उर्फ अशोक गुलाब नरसिंगे (रा. रायगव्हाण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच आश्रुबा आणि त्याच्या कुटुंबीयांनी दीपालीला मारहाण करून हाकलून दिले होते. त्यानंतर तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी आपसात प्रकरण मिटविले होते. पाच महिन्यापूर्वी दीपालीला मुलगी झाली. दोन महिन्यापूर्वी दिपाली आणि आश्रुबा सातेफळ येथील एम.डी. वीटभट्टीवर कामाला आले होते. तेव्हापासून ते तेथेच राहत होते. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी आश्रुबाने दिपालीला बाजार करण्यासाठी तीनशे रुपये दिले होते. त्याचा हिशोब देण्यावरून त्याने दिपालीला बेदम मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी निघून गेली होती. चार दिवसानंतर ती पुन्हा परतली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास आश्रुबा आणि दिपालीमध्ये पुन्हा तीनशे रुपयांच्या हिशोबावरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या आश्रुबाने दीपालीला विटांच्या साहाय्याने ठेचून काढले. यावेळी त्याची पाच महिन्यांची चिमुरडी नंदिनी ही समोरच बांधलेल्या झोळीत झोपलेली होती. दीपाली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आश्रुबाने नंदिनीला एकटेच घरात सोडून पळ काढला. त्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजता त्याने दीपालीचे चुलते भारत दादाराव उपाडे यांना फोन केला आणि ‘तुमच्या मुलीला मी विटांनी मारले आहे, मेली का जिती आहे ते जाऊन बघा आणि तिच्या आई-वडिलांना सांगा’ अशी उर्मट भाषा वापरत फोन बंद केला. त्यानंतर दीपालीच्या माहेरच्या लोकांनी रिक्षातून सातेफळ गाठले. तोपर्यंत दिपालीचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने हे करत आहेत.
पत्नीला मारून तो घेत होता आरामात चहाचे घोट खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला. मोबाईल लोकेशनवरून आश्रुबा उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुड परिसरात दिसून आला. तो हैदराबादला पलायण करण्याच्या तयारीत होता. ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी हरिदास नागरगोजे आणि रशीद पठाण यांच्या नजरेस पडला तेंव्हा तो मुरुडमधील एका हॉटेलमध्ये तो आरामात चहाचे घोट घेत बसला होता. पोलिसांनी त्यास ताबडतोब बेड्या ठोकून अंबाजोगाईला आणले.
चिमुरडी रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी वीटभट्टीवरील विटा रचलेल्या दोन खोल्यांच्या घरात आश्रुबाने दिपालीला संपविले. यावेळी त्याची पाच महिन्यांची मुलगी नंदिनी जवळच असलेल्या झोळीत झोपलेली होती. ती रात्रीतून कधीतरी उठली असेल तेंव्हा तिची आई या जगात राहिली नव्हती आणि क्रूरकर्मा बापाने पळ काढला होता. भुकेने व्याकूळ झालेली नंदिनी रात्रभर आईच्या मृतदेहापासून जवळच झोळीत सतत रडत होती.
आश्रुबाचे दुसरे लग्न : दीपाली ही आश्रुबाची दुसरी पत्नी होती. आश्रुबाचा यापूर्र्वी एक विवाह झालेला होता. मात्र, त्याने व त्याच्या कुटुंबियांनी दीपालीच्या कुटुंबियांपासून ही माहिती लपवून ठेवली. व दीपालीसोबत दुसरा विवाह केला होता. अशी माहिती दीपालीच्या नातेवाईकांनी दिली.
वीटभट्टीवर शांतता : खुनाच्या घटनेनंतर एमडी वीटभट्टीवर शांतता पसरली आहे. अकल्पितपणे घडलेल्या या घटनेमुळे येथील कामगार आणि महिला भेदरलेल्या अवस्थेत असून घडलेल्या प्रकाराबाबत उघडपणे कोणीही कसलीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. आम्हाला त्या दोघांबाबत फारसे काही माहित नाही असे त्यांनी सांगितले. तसेच, आश्रुबाचे घर आणि इतर घरांमध्ये खूप अंतर आहे आणि घटनेच्या वेळी पाऊस सुरु असल्याने दिपालीच्या किंकाळ्या आम्हाला ऐकू आल्या नाहीत, असे सांगितले.
आश्रुबाला पोलीस कोठडी खून केल्यानंतर परराज्यात पळून जाण्याची तयारी करीत असलेल्या अश्रुबाला पोलिसांनी मुरुड येथून अटक केली होती. गुरुवारी . या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास भिकाने यांनी गुरुवारी दुपारी आश्रुबाला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग दुसरे न्या. एकनाथ चौगले यांनी त्याला ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.