सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांचा प्रत्येक वर्षी विजयादशमीच्या दिवशी भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा असतो. २०२३मध्ये गैरहजर असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे यावेळी मेळाव्याला उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे. याच ठिकाणाहून २०२३मध्ये पंकजा मुंडे यांनी केलेली अनेक भाष्य २०२४मध्ये चुकीची ठरली आहेत. त्यामुळे यंदा त्या काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा मेळावा १२ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी राज्याचे नेते कोण येणार? हे अद्याप सांगितलेले नाही; परंतु जिल्ह्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहीण-भावाची जास्त चर्चा असते. आता हे दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे मेळाव्याला जाणार का? असा प्रश्न आहे.
जरांगेंच्या मेळाव्याचा परिणाम होणार का?
१२ ऑक्टोबरलाच श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी लाखो समाजबांधव येतील, असा दावा केला आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे.
प्रीतम घरी बसणार, हे चालणार नाही
मी दोन महिने घरात बसले तर वावड्या उठविण्यात आल्या. आता प्रीतम घरात बसतील, तुम्ही लढा, असे कोणी म्हणणार असेल तर ते चालणार नाही, असा थेट इशारा पंकजा मुंडे यांनी २०२३मध्ये स्वपक्षालाच दिला होता; परंतु हेच वाक्य खरे झाले. २०२४मध्ये डॉ. प्रीतम मुंडे या खासदार असतानाही त्यांचे तिकीट कापून पक्षाने पंकजा यांना लोकसभेची उमेदवार दिली; परंतु यात त्यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषद सदस्य केले.