- नितीन कांबळेकडा : घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची,शिक्षण घेण्यासाठी डोंगराएवढ्या अडचणी.आई,वडिल दरवर्षी उसतोडीला जायचे. आम्हाला जगविण्यासाठी त्यांची होत असलेली धडपड, त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून शिकून कुटुंबाचे नावलौकिक करेल अशी खूणगाठ मनाशी बांधली. आठ वर्षे बाहेरगावी राहून अभ्यास केला. अधिकारी होईल तेव्हाच दारात पाय ठेवायचा अशा जिद्दीने पेटलेला आष्टी तालुक्यातील खरकटवाडी येथील परमेश्वर महादेव तांदळे अखेर पोलिस उपनिरीक्षक झाला.
परमेश्वर महादेव तांदळे याचे प्राथमिक शिक्षण गावात व अहमदनगर जिल्ह्यातील बारदरी येथील आश्रमशाळेत तर माध्यमिक शिक्षण हे देवळाली येथील सरस्वती विद्यालयात आणि उच्चशिक्षण लोणी प्रवरा येथे झाले. हे करताना घरची परिस्थिती ही अंत्यत हलाखीची. आई, वडील ऊसतोडणी करून गरजा पूर्ण करायचे. गुराढोरासारखे काबाडकष्ट करायचे. हे सगळे पाहून परमेश्वरचा जीव तुटायचा. त्यामुळे मनात उराशी जिद्द बाळगून अहमदनगर गाठले. तिथे दिवसरात्र अभ्यास केला. २०१८ ला एमपीएसीची परीक्षा दिली पण अवघ्या सहा गुण कमी पडले. परत मनात खूणगाठ बांधली आणि जेव्हा अधिकारी होईल तेव्हाच गावात येईल असा निर्णय घेऊन अभ्यास केला. २०२२ ला परीक्षा दिली. पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याची बातमी खरकटवाडीत हताच ऊसतोडणी करणारे आई, बापाच्या डोळ्यात खूप मोठा आनंद दिसत होता.
आई, वडील, भावांचे कष्टच माझे मार्गदर्शकमाझ्या शिक्षणासाठी आई, बापाने रक्ताचं पाणी केलं तर मोठ्या भावानेदेखील डोंगराएवढा आधार दिला. माझ्यासाठी झटत असलेले माझ्या कुटुंबाचे काबाडकष्ट हेच माझ्या यशासाठी मार्गदर्शन होते, असे परमेश्वर तांदळे म्हणाला.
संधी हुकली; पण खचला नाही२०१८ झाला दिलेल्या परीक्षेत अवघ्या सहा मार्काने माझी संधी हुकली. पण हार मानली नाही. पुन्हा नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. रोज दहा तास अभ्यास करायचो, स्वयंपाक हाताने बनवायचो, अडीच हजार रुपयांत महिना घालायचो. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी दुसऱ्यांदा मात्र बाजी मारल्याचा आनंद वेगळाच होता.- परमेश्वर तांदळे, पोलिस उपनिरीक्षक