पाटोदा : जिल्ह्यात कायमस्वरूपी दुष्काळी व ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रोहतवाडी, बेनसूर शिवारात शेतकऱ्यांच्या १५ मेंढ्यांचा मृत्यूही झाला. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. भाजप नेत्या तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र, तालुक्याच्या बाहेरून कारभार पाहणारे कृषी व महसूल कर्मचारी हे पंचनामे करणार की, खरीप काळात घरात बसूनच नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिल्याप्रमाणेच या अवकाळीचेही तसेच होणार अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पाटोदा तालुका हा ऊसतोडणी मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याहीपेक्षा डोंगराळ भूभाग व अल्पसिंचन क्षेत्रामुळे कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुक्याचा कारभार पाहणारे वरिष्ठ अधिकारीही तालुक्याच्या बाहेर राहूनच कारभार पाहतात. खरीप हंगामात समाधानकारक पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर ही पिके काढणीस आलेली असताना १० ते १२ दिवस झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये जाहीर करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, महसूल व कृषी विभागाला तालुक्यातील नुकसान दिसले नाही. त्यामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले. तसेच खरीप पीकविमा भरलेले शेतकरी महसूल व कृषीच्या अहवालामुळे खरीप पीक विम्यासही मुकले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे खरिपात अतिवृष्टीची नुकसान भरपाई नाही. खरिपात अतिवृष्टीने क्षेत्र बाधित नसल्याचा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आला. त्यामळे खरीप पिकांचा विमाही मिळाला नाही. आता १८ फेब्रुवारी रोजी गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तरी पंचनामे होतील काय ? याबाबत शेतकऱ्यांना शंका आहे. पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.