बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे. २०१५ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस, रमेश आडसकर यांना सोबत घेऊन महायुती बनविली होतीण तर प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल रिंगणात उतरविले होते. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधून जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार निवडून आले होते. या ताकदीच्या जोरावर पंकजा मुंडे यांनी २०१५ ची बँकेची निवडणूक जिंकताना राष्ट्रवादीतील गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलला होता. शीतल दिनकरराव कदम (बीड), संध्या दशरथ वनवे (शिरुर), सत्यभामा रामकृष्ण बांगर (शिरुर), ऋषिकेश प्रकाशराव देशमुख (आडसकर) (केज), साहेबराव पंढरीनाथ थोरवे (आष्टी) यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. १९ पैकी १६ जागा महायुतीने तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या.
यावेळी राज्यातील सत्तेची भाकरी फिरली आहे. त्यावेळी बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, आता धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत. सत्ता बदलली तरी मतदार तेच आहेत. सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे तंत्रच वेगळे असते. आजही हे मतदार पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहेत. २०१५ मध्ये मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार जिंकले होते.
बीड जिल्हा बँकेत १३७५ मतदार असून, १९ संचालकांची ते निवड करणार आहेत. विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून गेल्या पाच वर्षांत बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे. प्रशासकाच्या काळात बँकेवर ३२७ कोटींचे कर्ज होते. गेल्या पाच वर्षांत हे कर्ज बेबाक केले आहे. बँकेची सध्या जवळपास १६०० कोटी रुपयांची उलाढाल आहे.