माजलगाव
: शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फुले पिंपळगाव शिवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या मालाच्या अनेक पोत्यांत पाच ते आठ किलो वजन कमी भरत असल्याची तक्रार येथील आडत व्यापाऱ्यांनी वखार महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर शुक्रवारी या ठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू झाले.
माजलगाव - गढी रस्त्यावर वखार महामंडळाचे एकाच ठिकाणी आठ गोडाउन असून यात व्यापारी व शेतकरी भाव वाढतील, या आशेने आपला माल या गोदामात ठेवतात. सध्या तूर, हरभरा, मूग, ज्वारी आदी धान्य मिळून १८ हजार पोती व्यापाऱ्यांनी ठेवली आहेत. यातील काही व्यापारी गोदामातून माल घेऊन जाण्यासाठी आले असता व त्यातील काही पोत्यांचे वजन करून पाहिले असता ५० किलोच्या अनेक पोत्यांमध्ये ५ ते ८ किलो वजन कमी भरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर व्यापारी व शेतकऱ्यांनी या ठिकाणी असलेल्या भांडारपाल यांच्याकडे तोंडी तक्रार केली. परंतु, त्यांनी याची दखल न घेतल्यामुळे यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली.
शेतकरी व व्यापाऱ्यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी परळी येथून वखार महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमार्फत पंचनामा केला असता तूर व हरभऱ्याच्या अनेक पोत्यांत वजन कमी असल्याचे व पोत्यांची शिलाई बदलल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. -----
या गोदामात अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यात येतो. या ठिकाणी ८ गोदामे असून १८ हजार पोती ठेवण्यात आली आहेत. या मालाची अनेक वेळा रास खाली पडत असल्याने कधीकधी पोते फुटतात, यामुळे जागेवर माल सांडतो. यामुळे यातील काही वरच्या बाजूच्या पोत्यांत माल कमी भरू शकतो.
---प्रिया करांडे, भांडारपाल
-----
अनेक वेळा वेअरहाउसला आमचा माल ठेवत असतो. या मालाचे पोते उन्हाळ्यात उन्हामुळे शंभर-दोनशे ग्रॅम कमी भरू शकते. तसेच पावसाळ्यात प्रत्येक पोत्यामागे एक ते दोन किलो वजन जास्त भरते. सध्या पावसाळा असताना व आम्ही माल मोजून दिलेला असताना आमच्या अनेक पोत्यांत ५ ते ८ किलो वजन कमी भरत आहे.
---- विलास जाधव, आडत व्यापारी