अंबेजोगाई : लॉकडाऊनमुळे वेगवेगळे कलावंत, बँडवादक, वेटर, फोटोग्राफर यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने जाहीर केलेली मदतही तोकडी आहे. पोटाची खळगी भरायची कशी, असा सवाल हे लोक करत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक व्यवसाय कोलमडले आहेत. परिणामी, घरात बसून डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर फेडायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन तीन महिने सुरू झाले. यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. त्यानंतर, व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध लावण्यात आले. बाजारात आर्थिक मंदी निर्माण झाली. परिणामी, दुकानात, विविध व्यवसायांत काम करणाऱ्या अनेक कामगारांना काढण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली. हॉटेल व्यवसाय बंद राहिल्याने व ग्राहकांनीही या व्यवसायाकडे पाठ फिरविली. त्यामुळे अनेक वेटर बेरोजगार झाले. त्यातच अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. रुग्णालयातील हजारोंच्या बिलाने अनेकांचे कंबरडे मोडले. कमाई नाही अन् खर्च मात्र मोठा, अशी स्थिती अनेक कुटुंबाची झाली. गावोगावच्या यात्रा बंद झाल्याने अनेक कलावंत बेरोजगार झाले, तर गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालये बंद राहिली. बँडपथक बंद राहिले, तर हलगी, जागरण गोंधळ व विविध कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंडपवाले, मंगलसेवा यांचे व्यवसाय ही पूर्ण कोलमडले. व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते ही भरणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. या सर्व व्यावसायिकांना आपल्याकडे कामासाठी असणारे माणसं सांभाळने मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. तर फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत.
....
आर्थिक पाठबळ देण्याची गरज
लॉकडाऊनच्या स्थितीवर मात करण्यासाठी शासनाने अनेक घटकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यात अजूनही अनेक घटक उपेक्षित राहिले आहेत. अशा सर्व घटकांना न्याय देऊन व त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाणे यांनी केली आहे.
....