लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील ढेकणमोहा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाल्यामुळे शेतकरी शुभांगी नागेश शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. घरातील अन्न, धान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच कुक्कुटपालनाचे ५० पत्रे उडाल्याने येथील २०० ‘कडकनाथ’ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. शेडची भिंतही पडली. तसेच कुक्कुटपालनासाठी आणलेल्या ५ ते ६ क्विंटल धान्याचे नुकसान झाले.
दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे वीज कोसळून राजेश भानुदास मुंडे यांच्या शेतातील म्हैस ठार झाली. वासरू सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. तसेच परळी तालुक्यातील धारावतीतांडा येथे अनेक घरावरील पत्रे उडून चिमाजी राठोड (वय ६०) हे जखमी झाले. दाऊतपूर येथील जि.प. शाळेचे पत्रे उडून गेले. नेकनूर परिसरातही सायंकाळी पाऊण तास पावसाने हजेरी लावली. बीडसह इतर ठिकाणी सौम्य पाऊस झाला.