लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या कमी झाली आहे. व्यापारीपेठादेखील खुल्या झाल्याने बाजारात गर्दी वाढत आहे. व्यापारी पेठेतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र शहरातील अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. रस्त्यावर नागरिक विना मास्क फिरत आहेत. यावर कसलीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुचाकीवर जाणारे, येणारे नागरिक व पायी जाणारे नागरिक तोंडाला मास्कदेखील बांधत नाहीत. यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. गेवराई शहरात व ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषद, पोलीस, महसूलकडून दुकानांना सील, दंड करण्यात आलेला नाही. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांकडूनही दंड वसूल केला जात नसल्याने नागरिकही बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
....
बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. मात्र कोरोना गेलेला नाही. तरी नागरिकांनी निष्काळजीपणे राहू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. विना मास्क फिरू नये. सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
....