गेवराई : रुग्णालयात नेताना जीप चिखलात फसल्यामुळे वेळेत उपचाराअभावी एका आजारी दिव्यांग महिलेचा जीपमध्येच मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा-चोरपुरी रस्त्यावर सोमवारी दुपारी घडली. लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचे ढोल बडविले जात असतानाच रस्त्याच्या दुरवस्थेने मात्र एका चाळीस वर्षीय महिलेचा बळी गेला आहे.
आशाबाई उमाजी गंडे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या दिव्यांग महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे आशाबाईंच्या उपचारासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू झाली. आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला तर दोन तास यायला लागतील, असे कळविण्यात आले. त्यामुळे खाजगी डॉक्टरांशी संपर्क केला तर तेही खराब रस्त्यामुळे येण्यास तयार नव्हते. परिणामी, चकलांबा येथील खाजगी जीपचालकाला संपर्क केला. रस्ता व चिखलामुळे तोही सुरुवातीला येण्यास नकार दर्शवित होता. नंतर चिखलातून कसाबसा मार्ग काढीत जीप चोरपुरीत आणली. तेथून आशाबाई गंडे यांना रुग्णालयात नेताना जीप चिखलात फसली. चालकाने खूप प्रयत्न करूनही जीप फसलेलीच राहिली. तेथून आशाबाईंना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अन्य पर्यायदेखील उपलब्ध नव्हता. दरम्यान वेळेवर उपचार मिळू न शकल्याने वाहनातच आशाबाईंची प्राणज्योत मालवली. सायंकाळी या महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील चकलांब्यापासून चार किलोमीटर अंतरावर चोरपुरी हे डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळ्यात तर दळणवळणाचा प्रश्न असतो. चारचाकी, दुचाकी सोडाच; परंतु पायी चालणेदेखील ग्रामस्थांची कसोटीच असते. गावात कुठलीही सोय नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो.
140921\14bed_7_14092021_14.jpg~140921\14_2_bed_6_14092021_14.jpeg
आशाबाई गंडे