लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पतीच्या नावे असलेली जमीन पत्नीच्या नावे करुन नवीन फेरफार करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्वाती सूर्यभान घुगे (३२, रा. शिवाजी धांडे नगर) या महिला तलाठ्यासह महादेव छत्रभुज मोरे (५२, रा. गुंदा वडगाव ता. बीड) या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी तालुक्यातील केसापुरी परभणी येथे दुपारी १ वाजता करण्यात आली.स्वाती घुगे या केसापुरी परभणी येथील सज्जावर तलाठी म्हणून कार्यरत होत्या. एका शेतकऱ्यास स्वत:च्या नावे असलेली जमीन पत्नीच्या नावे करुन नवीन फेरफार करायचा होता. त्यासाठी त्याने तलाठी कार्यालयात धाव घेतली. तेव्हा त्यांना एक हजार रुपयांची लाच मागण्यात आली. शेतकºयाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सापळा लावला. बुधवारी दुपारी तलाठी कार्यालयात शेतकºयाकडून एक हजार रुपये लाच स्वीकारताना महादेव मोरे व तलाठी स्वाती घुगे यांना पकडण्यात आले. या प्रकरणी पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद येथील अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, निरीक्षक गजानन वाघ, कल्याण राठोड, राकेश ठाकूर, मनोज गदळे आदी कर्मचाºयांनी केली.
महिला तलाठ्यासह दलाल ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:26 AM