बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सध्या संथ गती असली तरी महिला पुरुषांच्याही पुढे असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण लाभार्थ्यांपैकी ६.१५ टक्के पुरुषांनी लस घेतली आहे तर महिलांचा टक्का ६.२१ एवढा आहे. सुरुवातीपासूनच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटांत जवळपास १२ लाख लाभार्थी आहेत तर ४५ वर्षांवरील ९ लाख लाभार्थी आहेत. या महिला लाभार्थ्यांची संख्या ९ लाख ६६ हजार एवढी आहे तर पुरुष लाभार्थ्यांची संख्या ११ लाख ३४ हजार एवढी असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ३५८ महिलांनी लस घेतली आहे तर १ लाख ८४ हजार ५०३ पुरुषांनी लस घेतली आहे. इकडे आकडा कमी दिसत असला तरी एकूण लाभार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी काढली असता महिलाच पुढे असल्याचे समोर आले आहे. आजही महिला लाभार्थी लसीकरण केंद्रावर उभा राहून लस घेण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. लस घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. त्याचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरणात पाटोदा तालुका अव्वल
कोराेना लस देण्यात पाटोदा तालुका अव्वल आहे. आतापर्यंत या तालुक्यात २७ हजार ३२४ लोकांना लस दिली असून याचा टक्का ५३ आहे तर सर्वांत कमी २६ एवढा टक्का माजलगाव तालुक्याचा आहे. लसीकरणाबाबत आपण योग्य त्या सूचना देत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे यांनी सांगितले.
---
एकूण लाभार्थी संख्येच्या ४६ ते ४७ टक्के महिला लाभार्थी आहेत. महिलांची संख्या पुढे असल्याचे टक्केवारीवरून दिसते. आतापर्यंत १५५५०३ पुरुष तर १८४३५८ महिलांनी लस घेतली आहे.
डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण
--
तालुकानिहाय आकडेवारी
आष्टी ४०१६७
अंबाजोगाई ४९३४६
बीड ९४२२९
धारूर १८५३०
गेवराई ४३७१४
केज ४३७१५
माजलगाव २९५८९
परळी ५८२९७
पाटोदा २७३२४
शिरूर १६३४०
वडवणी ११५७२
---
१८४५०३ पुरुषांनी घेतली लस
१५५३५८ महिलांनी घेतली लस