बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अस्थापना २ मध्ये सर्व पुरूष कर्मचाऱ्यांची कामे असतात. परंतु याचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. विशेष म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांची बदली होऊनही अद्याप इतरांकडे पदभार सोपवलेला नाही. या पदावर नियमित कर्मचारी नियुक्त करावा, या मागणीचे निवेदन कर्मचारी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.
जि.प.च्या आरोग्य विभागातील अस्थापना २ मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, शिपाई आदी कर्मचाऱ्यांची कामे असतात. याच विभागातून कर्मचाऱ्यांची पदोन्नती व इतर लाभांच्या फाईल पुढे पाठविल्या जातात. परंतु मागील काही दिवसांपासून हे सर्व कामे रखडले आहेत. विशेष म्हणजे पुरूष कर्मचाऱ्यांची अस्थापना असतानाही महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच याच महिला कर्मचाऱ्याची जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागात २० ऑगस्ट रोजी बदली झाली आहे. तरीही आरोग्य विभागातील अस्थापनेचा पदभार सोडलेला नाही. त्यामुळे सर्व कामे खोळंबत असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेने केली आहे. हा पदभार नियमित कर्मचाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणीही संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अध्यक्ष मनेंद्र बागलाने, शेख साजीद, किशोर जाधव, संदीपान मांडवे, व्ही.व्ही.सानप, एस.ए.धुताडमल, एच. बी. अडागळे आदींची उपस्थिती होती.