- पुरुषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) : येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतिदरम्यान मीरा एखंडे व त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर महिलांनी या रूग्णालयाकडे अक्षरश: पाठ फिरविली आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घसरली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयालयात डिसेंबर २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मीरा एखंडे या प्रसुतीसाठी आल्या होत्या. प्रसुतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांवर आरोप झाले. हे प्रकरण राज्यभरात गाजले. या घटनेचा परिणाम ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरोदर महिलांवर झाला आहे.
याआधी या रुग्णालयामध्ये प्रत्येक महिन्याला १५० ते २०० प्रसुती व्हायच्या. डिसेंबर २०१८ मध्ये १५८ महिलांची प्रसुती झाली होती. त्यात ३५ महिलांचे सिझेरियन झाले. मात्र या घटनेनंतर जानेवारी महिन्यात रूग्णालयात केवळ ६३ प्रसुती झाल्या. त्यात ८ सिझेरियन आॅपरेशन झाले. पुढे फेब्रुवारी महिन्यात ही संख्या आणखी घटून ५७ वर आली. त्यात एकही सिझेरियन झाले नाही. एखंडे प्रकरणानंतर महिलांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी पाठ फिरवली आहे. संबंधित विभागात तज्ज्ञांची कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका न घेता थेट बीडला रेफर केले जात असल्याची माहिती समोर रूग्णांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितली.
रूग्णांना आर्थिक भुर्दंडगरोदर महिलांची परिस्थिती गंभीर असल्यास खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडाला देखील सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात पुरेशा तज्ज्ञांची नियुक्ती करुन तसेच साहित्य पुरवठा करून रुग्णांची लूट थांबविण्याची मागणी होत आहे.
सात मुलींनंतर मुलगा झाला पण...मीरा एखंडे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर सायंकाळी प्रसुतीकळा वाढल्यानंतर डॉक्टरांनी प्रसुतीसाठी घेऊन गेले असता रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या पतीकडून कागदपत्रांवर सह्या घेतल्या व प्रसुती लवकरच होईल, असे सांगितले. तोपर्यंत बाळ पोटामध्येच दगावले. त्यानंतर लगेचच मीरा यांचादेखील मृत्यू झाला. डॉक्टरांनी रात्री नातेवाईकांना विचारात न घेता शवविच्छेदन केले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या विरोधात नातेवाईकांनी तक्र ार केली. यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांना येथून हलवले. मीरा एखंडे यांची ही आठवी प्रसुती होती. यापूर्वी त्यांना सात मुली होत्या. आठवा मुलगा झाला, पण तो वाचू शकला नाही.
औषधी आणावी लागते बाहेरूनप्रसुतीसाठी आलेल्या बहुतांश महिला गरीब असतात. उपचारासाठी लागणारी औषधी अनेक वेळा बाहेरून आणण्यास सांगितली जाते. ही औषधी रुग्णालयामार्फतच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
विभाग लवकरच पूर्ववत होईल प्रसुती विभागात वरिष्ठ पातळीवरून स्त्रीरोग तज्ञ व भूल तज्ज्ञ यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. या माध्यमातून प्रसूती विभाग लवकरच पूर्ववत होईल. - डॉ. गजानन रुद्रावर, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव