माजलगाव
: तालुक्यातील पात्रुड-जीवनापूर रोडवरील पात्रुडजवळच्या पुलाचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केले होते. यास एक वर्ष पूर्ण होऊनही या पुलाचे बांधकाम न करता अर्धवट अवस्थेत ठेवले असून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पात्रुड-जीवनापूर या राज्यरस्त्याचे काम चालू होऊन एक वर्ष झाले, तरी अर्धवट कामामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. साइटपट्ट्या न भरल्याने अपघात होत आहेत. तर, पात्रुडजवळील पुलाचे काम चालू होऊन एक वर्ष पूर्ण झाले, तरी याकडे लोकप्रतिनिधी व सां. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. पात्रुडच्या पुलाचे उद्घाटन करून लोकप्रतिनिधींनी सोपस्कार पार पाडले. नंतर या कामाचे काय झाले, कुठपर्यंत झाले, याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पुलाचे बांधकाम कधी होणार, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. पुलाचे काम न झाल्याने पुलाच्या एका बाजूने पर्यायी कच्चा पूल केला असून या पुलावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी होत आहेत. काही छोटी-छोटी वाहने पलटी होण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पात्रुड- जीवनापूर रोडवरील अर्धवट काम सार्वजनिक बांधकाम विभाग व आ. प्रकाश सोळंके यांनी लक्ष देऊन लवकर करण्याची मागणी जनतेतून होत आहे.