संघटना एकवटल्या : पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बीड : जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम चालू करावे, यासाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव ९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. परंतु अद्यापही छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करावा आणि काम लवकर चालू करावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनीही कामाबाबत आश्वासन दिले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, सभापती बजरंग सोनवणे, माजी आमदार सुनील धांडे, भाऊसाहेब डावकर, विठ्ठल बहीर, भागवत मस्के, संभाजी सुर्वे, श्रीकांत बागलाने, विजय लव्हाळे, भरत वालेकर, पंडित तुपे, संदीप नवले, नारायण गवते आदींची उपस्थिती होती.