बीड: दिवसभर हॉटेलमध्ये काम केले. काम आटोपल्यावर घरी जाताना दोन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत महिलेची पर्स हिसकावून घेत धूम ठोकली. परंतु, याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याकडून पर्सही परत मिळवली. ही घटना बीड शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोम शाहाजी फाटक (वय १९, रा. घोसापुरी, ता. बीड) याच्यासह अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीड शहरातील जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये काम पूर्ण केल्यानंतर मंगल उद्धव सुपेकर (रा. सम्राट चौक) या सुनंदा देवकर यांच्यासोबत घरी जात होत्या. बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पांगरी रोडवर आले असता चोरट्यांनी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत मंगल यांच्या हातातील पर्स हिसकावून घेत धूम ठोकली. हा प्रकार तातडीने पोलिसांना कळविला.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर हे दोन आरोपी हाती लागले. त्यांच्याकडून पर्सही हस्तगत केली आहे. पर्समध्ये रोख १६०० रुपये होते. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने केली.