परळी- पूस- बर्दापूर हा राज्यरस्ता खराब झाल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ६७ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यानुसार संबंधित एजन्सीने काम सुरू केले; परंतु ते काम अर्धवट केल्याने नंदागौळसह पूस, जवळगाव, बर्दापूरसह अनेक गावांच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. लवकरात लवकर हे काम सुरू करावे; अन्यथा २० मेपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सुंदर गित्ते यांनी दिला होता. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एन.टी. पाटील यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अभियंत्यांनी सध्या लॉकडाऊन सुरू असून, ३० मेपर्यंत सर्व कामगार, मशीन ऑपरेटर यांना बोलावून घेऊन ५ जूनपूर्वी परळी- पूस- बर्दापूर या राज्य रस्त्याचे काम सुरू करण्याची लेखी हमी १९ मे रोजी दिली.
परळीहून लातूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग
सध्या परळी येथून अंबाजोगाईमार्गे लातूर असा प्रवास सर्व वाहनधारक करतात; परंतु त्यापेक्षा परळी-नंदागौळ- पूस- जवळगाव- बर्दापूर व तेथून बर्दापूर फाटा या रस्त्याचे काम व्यवस्थित करून रस्ता सुरळीत झाल्यावर परळी ते लातूरला जाण्यासाठी सर्वांत जवळचा मार्ग ठरेल. अंबाजोगाई मार्गापेक्षा या मार्गाने गेल्यास साधारण २० किलोमीटर अंतर वाचेल, म्हणून हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे.