पिंपळा धायगुडा ते मांजरसुंभा या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. हा महामार्ग अंबाजोगाईमार्गे जातो. नादुरुस्तीमुळे हा रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. या रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. या रस्त्याला खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. अंबाजोगाई, परळी, पूस, घाटनांदूर, या गावांकडे जातांना व अंबाजोगाई परळी या मुख्य मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. याठिकाणच्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच कंत्राटदाराचे रस्त्यावर पडलेले साहित्य, वाळू, मुरूमाचे ढिगारे, यामुळेही मोठे अडथळे येतात. ही अडथळ्यांची शर्यत पार करत वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. या खड्डेमय मार्गावरून खडतर प्रवास करत वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वाहनचालकांची होतेय हेळसांड
पिंपळा ते मांजरसुंबा या महामार्गाचे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवस असल्याने वाहनधारकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख
यांनी केली आहे