अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून पिंपळा ते मांजरसुंबा या महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आल्याने हा रस्ता संपूर्णत: खड्डेमय झाला आहे. या खडतर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या धोकादायक रस्त्यावर रोज लहानमोठे अपघात सुरूच असून संथगतीने काम सुरू असलेला हा रस्ता वाहनचालकांसाठी तत्काळ पूर्ण करावा, अन्यथा हे अपघाताचे सत्र सुरूच राहील, अशी स्थिती आहे.
पिंपळा, धायगुडा ते मांजरसुंबा या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. हा महामार्ग अंबाजोगाईमार्गे जातो. हा रस्ता सध्या धोकादायक बनला आहे. या रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. या रस्त्याला खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. अंबाजोगाई, परळी, पूस, घाटनांदूर, या गावांकडे जाताना व अंबाजोगाई-परळी या मुख्य मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना करावा लागतो. तारेवरची कसरत करत हे १० कि.मी.चे अंतर पार करण्याची मोठी कसरत वाहनचालक करत आहेत. दुचाकीचालकांचे वाहन निसटल्याने लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने सुरूच आहेत. आजपर्यंत या रस्त्यामुळे शेकडो जण जखमी झालेले आहेत. अशा स्थितीतही या रस्त्यावरून वाहनधारकांचे मार्गक्रमण सुरूच आहे.
खोदकामामुळे अडथळा
या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवल्याने रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यातच कंत्राटदाराचे रस्त्यावर पडलेले साहित्य, वाळू, मुरुमाचे ढिगारे, यामुळेही मोठे अडथळे येतात. ही अडथळ्यांची शर्यत पार करत वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. या खड्डेमय मार्गावरून खडतर प्रवास करत वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वाहनचालकांची हेळसांड
पिंपळा ते मांजरसुंबा या महामार्गाचे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. परिणामी, पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनधारकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप यांनी केली आहे
===Photopath===
240421\20210319_160537_14.jpg