आष्टी : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आष्टी येथे एक कोटी ८० लक्ष रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती लवकरच करण्यात येणार असून आष्टी ग्रामीण रुग्णालय व शासकीय आयटीआय येथे वाढीव १०० ऑक्सिजन बेडसाठी ९ लक्ष ६० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडसाठी सेंट्रल ऑक्सिजन लाईन टाकण्याच्या कामास ३ लक्ष ८० हजार रुपये मंजूर झाले आहेत. ही सर्व कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली.
आष्टी येथील ऑक्सिजन प्लांटची निर्मिती ही येत्या दहा ते पंधरा दिवसांत होणार असून त्यामुळे मतदारसंघासाठी लागणारा सर्व ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामुळे मतदारसंघातील ऑक्सिजनचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे. आष्टी येथे ग्रामीण रुग्णालय व शासकीय आयटीआयमध्ये वाढीव १०० बेडसाठी सेंट्रल ऑक्सिजन लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जनतेसाठी आपण पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे कोविड रोखण्यासाठी विविध यंत्रसामुग्रीसाठी पाठपुरावा करीत असून शिरूर येथेही ३० ऑक्सिजन बेडसाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत असल्याचे ते म्हणाले.
रुग्णालय बिलांबाबत तक्रारींसाठी समिती
जनतेने सरकारी दवाखान्यात उपचार घ्यावेत. पर्याय नसल्यास खासगी दवाखान्यात जावे. परंतु गेल्या काही दिवसांत खासगी डॉक्टरांकडून उपचाराच्या नावाखाली कोविड रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. खासगी डॉक्टरांनी व्यवसायाबरोबरच सेवा धर्म पाळावा. जास्तीच्या बिलाबाबत काही तक्रारी असल्यास तालुकास्तरावर शासकीय समिती गठित करण्यात आली असून यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आमदार आजबे यांनी केले.