दीपक नाईकवाडे
केज : 'आमचा गाव आमचा विकास' कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांची कार्यशाळा व प्रशिक्षणाचे ११ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आयोजन करण्यात आले होते. मात्र, आडस पंचायत समिती गणाच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षकच नियोजित वेळेत न आल्याने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाविनाच गावी परतावे लागले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशिक्षणाच्या मिळालेल्या पत्रास हार घालून गांधीगिरी करत संताप व्यक्त केला.
तालुक्यात सबकी योजना सबका विकास राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान सन २०२०-२१ अंतर्गत राज्य शासनाच्या पंचायत राज प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसंसाधन गट सदस्यांच्या कार्यशाळेचे पंचायत समिती गण निहाय 'ग्रामपंचायत विकास आराखडा' सन २०२१-२२ या विषयावर प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन केले होते. मार्गदर्शनासाठी पंचायत समिती प्रशासनातील विस्तार अधिकारी बाबुराव राऊत यांना नियुक्त केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसंसाधन गट, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य पर्यवेक्षक आणि वन अधिकाऱ्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. गैरहजर राहणाऱ्यांना तंबी देण्यात आली होती.
प्रशिक्षणार्थी तीन तास ताटकळले
आडस येथे पंचायत समिती गणातील महिला - पुरूष प्रशिक्षणार्थी सकाळी दहा वाजल्यापासून प्रशिक्षणस्थळी उपस्थित होते. प्रशिक्षकांची दोन - तीन तास वाट पाहून दुपारी बारा वाजेपर्यंत कोणताही जबाबदार अधिकारी न आल्याने उपस्थित संतप्त प्रशिक्षणार्थींनी गांधीगिरी आंदोलन करत गावाकडची वाट धरली.
पंचायत समितीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणास ग्रामसेवकांची गैरहजेरी होती. अनेक ग्रामसेवकांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे पत्र ग्रामपंचायत सदस्यांना दिले नसल्याचे बहुतांश प्रशिक्षणार्थींनी सांगितले. मग प्रशिक्षणावर खर्च केला जाणारा निधी नेमका जातो तरी कुठे! आमचा पाच वर्षाचा सदस्य पदाचा कार्यकाळ अप्रशिक्षित म्हणूनच जाणार की काय? असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला.
जिल्हास्तरीय चौकशी समिती अचानक तालुक्यात आल्याने मला केवड येथे जावे लागले. त्यामुळे मला प्रशिक्षणाच्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यास वेळेत उपस्थित राहता आले नाही.
- बाबुराव राऊत
विस्तार अधिकारी.
निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असताना तीन वर्ष होऊन गेली तरी अद्याप एकदाही प्रशिक्षण झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना शासनाच्या लाभाच्या योजनांची माहिती देण्यात अडचण निर्माण होते.
- शिवरूद्र आकुसकर, ग्रामपंचायत सदस्य, आडस.