- सोमनाथ खताळबीड : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन आता शून्याकडे वाटचाला करत असल्याचे दिसत आहे. २००९-१० साली जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ५.५ एवढा होता. आता तो घसरून केवळ ०.२९ वर आला आहे (The percentage of HIV infected people decreased in Beed Dist. ) . जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने केलेली जनजागृती आणि रुग्णांचे समुदपदेशन करून केलेल्या उपचाराचे हे यश समजले जात आहे. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
बीडमध्ये २००९ साली बीडमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष स्थापन झाला. जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी औषधोपचार केले जातात. तसेच १४ ठिकाणी समुपदेशन व तपासणी केंद्र तयार केले आहेत. सहा ठिकाणी लिंक सेंटर तयार करून रुग्णांना औषधोपचार केले जातात. तसेच वर्षभर या विभागाकडून शाळा, महाविद्यालय, गावांत, सार्वजनिक ठिकाणी एचआयव्हीबद्दल जनजागृती केली जाते. तसेच घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक साधना गंगावणे व त्यांची टीम यासाठी मेहनत घेत आहे.
खात्रीसाठी ३ वेळा तपासणीएखाद्या रुग्णाची एचआयव्ही तपासणी केली आणि त्यात काही प्रमाणात पॉझिटिव्हचे प्रमाण जाणवले तर पथकाकडून आणखी दोन वेळा तपासणी केली जाते. तीनही अहवालात पॉझिटिव्ह आले तरच तो एचआयव्ही बाधित आहे, असे घोषित करून औषधोपचारासह काळजी घेण्याबाबत समुपदेशकांकडून सल्ला दिला जातो.
या लोकांसाठी विशेष कार्यक्रमविटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, विविध प्रकारचे मजूर, ट्रकचालक, रिक्षाचालक, लांबचा प्रवास करणारे ट्रक चालक या लोकांसाठी डापकू विभागाकडून विशेष कार्यक्रम घेतले जातात. तसेच त्यांची वेळच्यावेळी तपासणी केली जाते. त्यातच अतिजोखमीच्या लोकांवर या विभागाची अधिक नजर असते.
गर्भवती बाधित होण्याचे प्रमाणही घटलेप्रत्येक गर्भवतीची एचआयव्ही तपासणी केली जाते. यात २००९-१० साली याचे प्रमाण ०.३ टक्के एवढे होते तर सध्या याचे प्रमाण कमी होऊन अवघे ०.०२ एवढे झाले आहे. तसेच तपासणीचा आकडाही वाढला आहे.
आतापर्यंत ३७३८ जणांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत एड्सने ३ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जिल्हा रुग्णालयांतर्गत ३ हजार १४० व अंबाजोगाई अंतर्गत ३ हजार ४०७ एवढ्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५४७ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात ७३१ बालकांचाही समावेश आहे.
यावर्षी महिनाभर होणार जनजागृतीयावर्षी प्रकल्प संचालकांच्या आदेशानुसार १ ते ३१ डिसेंबर दरम्यान विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. ‘असमानता संपवा, एड्स संपवा’ हे घोषवाक्य असून प्रत्येक केंद्रांतर्गत कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे गंगावणे यांनी सांगितले.