सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परिस्थितीवर मात करुन जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ऊसतोड कामगाराने दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असलेल्या ज्योतीराम शाहु घुले याची दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने त्याच्या संघर्षमय प्रवासाचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.केज तालुक्यातील डोणगाव या खेडेगावातील ज्योतीराम रहिवासी. गावातच प्राथमिक शिक्षण झाले. जवळच असलेल्या जाधवजवळा, दहीफळ वडमाऊली येथे माध्यमिक, तर केज व बीडला उच्च शिक्षण झाले. घरी केवळ तीन एकर शेती. त्यामुळे आई-वडील ऊसतोडणीला जात होते. त्यावरच कुटुंबाचा गाडा चालायचा. ज्योतीराम हा एकुलता एक आहे. सीमा व मीराबाई या दोघी बहिणी. परिस्थिती हलाखीची असल्याने वयाच्या दहाव्या वर्षीच ज्योतीरामच्या हाती कोयता आला. आई-वडिलांना मदत म्हणून तो ऊसतोडणीसाठी जात होता. तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम केले. त्यानंतर कापूस केंद्रावर मजुरी केली. काम करीत असतानाच क्रिकेटचा छंद जोपासला.२००८ ला क्रिकेटच्या करिअरला सुरुवात झाली. यष्टीरक्षक व फलंदाज असणाऱ्या ज्योतीरामची राज्यस्तरावर निवड झाली. गोंदिया येथे झालेल्या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट खेळ करुन राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.नागपूरला पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना ज्योतीरामने चौकार, षटकारांची आतिषबाजी करीत दोन अर्धशतके झळकावली. त्यानंतर २०१० साली पाकिस्तानला भारतीय संघाचा पहिला दौरा झाला. उत्कृष्ट खेळ असतानाही ज्योतीरामला संधी मिळाली नाही. त्यामुळे तो नाराज झाला. अन् दोन वर्षे खेळापासून दूर राहिला. पुन्हा जोमाने सराव केला अन् उत्तुंग झेप घेत मातृभूमीत पुढच्या वर्षी होणाºया दिव्यांग विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याची भारतीय संघात निवड झाली. बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे.शेख अजहर, विशाल परदेशी, सुनील वाघमारे, निसार तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. तर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, दिलीप घुले, सुरेंद्र खेडगीकर, प्रा. प्रशांत जोशी, उत्तम आंधळे, सतीश लाड, गोरख मुंडे, मारुती केदार यांनी त्याला मदत केली.तर दिव्यांगांचा खेळ आवडेल !दिव्यांग विश्वचषक स्पर्धा प्रथमच होत आहे. पे्रक्षक जसे सर्वसामान्य खेळाडूंचे क्रिकेट पाहतात त्यापेक्षाही सुंदर प्रदर्शन दिव्यांगांचे आहे. एकदा खेळ पाहिल्यानंतर प्रेक्षक सर्वसामान्यांचे कमी अन् दिव्यांगांचे क्रिकेट सामने सर्वाधिक पाहतील, असा विश्वास ज्योतीरामने व्यक्त केला.
ऊसतोड कामगार बनला जागतिक क्रिकेटपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:53 PM
परिस्थितीवर मात करुन जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ऊसतोड कामगाराने दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असलेल्या ज्योतीराम शाहु घुले याची दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने त्याच्या संघर्षमय प्रवासाचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.
ठळक मुद्देबीडच्या ज्योतीराम घुलेचा संघर्षमय प्रवास : २०१९ च्या दिव्यांग विश्वचषकासाठी झाली निवड