बीड : भव्य सभामंडप... फुग्यांनी सजवलेल्या सोफ्यांवर पांढरे फेटे घालून बसलेल्या गर्भवती माता.... वाद्यवृंदाचा गजर... व्यासपीठावरुन गायिली जाणारी डोहाळ्याची गाणी...सुमधूर अभंग....गवळणी अशा उत्साहपूर्ण वातावरणात पहिल्यांदाच २०३ गर्भवती मातांचा सामुहिक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. बीडमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात हा आगळा वेगळा कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य विभागाकडून या मातांची तपासणीही झाली. याची ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव होत आहे. दोन दिवसांपूर्वीच ८३६ कन्यारत्नांचे सामुहिक नामकरण झाल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच २०३ गर्भवती महिलांचे सामुहिक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चार भिंतीच्या आत होणारा हा कार्यक्रम पहिल्यांदाच अशा प्रकारे सार्वजनिक आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची पुन्हा एकदा ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. खटोड प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतम खटोड यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच्या नामकरण सोहळ्याचीही रेकॉर्ड झाले होते. चार दिवसांत दुसऱ्यांदा हे रेकॉर्ड बीडमध्ये झाल्याचे निरीक्षक कुकडेजा व कुलकर्णी यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, गौतम खटोड, भरतबुवा रामदासी, अभय कोटेचा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आई अन् सासु सोबत ‘फोटो सेशन’आई किंवा आपल्या सासु सोबत गर्भवती महिला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. आपल्या मुलीचा फेटा अन् पुष्पगुच्छ आणि ओटी भरून झालेला सन्मान पाहून त्या भारावून गेल्या. यावेळी अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोणी सेल्फी घेत होते तर कोणी दुसऱ्याकडे फोन देत विनंती करून फोटो काढताना दिसून आले.
गर्भवतींच्या तपासणीसाठी विशेष पथककार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक गर्भवती महिलेची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी विशेष पथक नियूक्त केले होते. वजन, उंची, रक्तातील शर्करा, हिमोग्लोबीन, पांढरा कावीळ, थायरॉईड आदींची तपासणी झाली. तसेच शासकीय रुग्णालयात करावयाची सोनोग्राफी याबाबत मार्गदर्शन केले गेले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या महालॅब टिमकडून महिलांची रक्ततपासणी केली केली.